पुणे : ‘‘भारतात विविधतेमध्ये एकता आहे. जगात सर्वात मोठी लोकशाही आपल्याकडे असून, हिंदी ही देशाची भाषा आहे. स्वातंत्र्य मिळविण्याच्या अतिशय कठिण काळात हिंदीने सर्वांना एकत्र बांधण्याचे काम केले. आपल्या देशात अनेक बोलीभाषा आहेत. त्यांना जोडून ठेवण्याचे काम हिंदीने केले. त्यामुळे आपल्या सर्व कार्यालयीन कामामध्ये हिंदीचा वापर करणे आवश्यक आहे,’’ असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
हिंदी दिनानिमित्त बालेवाडी म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात १४ व १५ सप्टेंबर दरम्यान अखिल हिंदी राजभाषा संमेलन होत आहे. गुरूवारी सकाळी या संमेलनाचे उद्घाटन झाले. त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अमित शाह यांनी शुभेच्छा दिल्या. उद्घाटनाला राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार, गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा, राज्यमंत्री भानूप्रताप वर्मा, केंद्रीय राजभाषा विभागाच्या सचिव अंशूल आर्या, मीनाक्षी जोरी, रामनरेश शर्मा आदी उपस्थित होते. राजभाषा हिंदीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना सन्मानही या वेळी झाला.
हरिवंश म्हणाले,‘‘हिंदी आपल्या देशाची भाषा आहे. तिचा सन्मान करण्यासाठी हा राजभाषा दिन साजरा केला जातो. आपल्या देशाची ओळख हिंदी भाषेमुळे होते. त्यामुळे प्रत्येकाने ही भाषा बोलली पाहिजे तरच ती जीवंत राहील.’’ भारती पवार म्हणाल्या,‘‘हिंदी ही राजभाषा असून, तिने आपल्या सर्व बोलीभाषांनाही जीवंत ठेवले आहे. खरंतर आपण जेव्हा आपले दु:ख कोणाला सांगायचे ठरवतो, तेव्हा ते आपल्या मातृभाषेतूनच समोर येते. आपण मातृभाषेतून विचार करत असतो, भावना व्यक्त करत असतो. त्यामुळे तिचे अत्यंत महत्त्व आहे. संपूर्ण देशाला जोडण्याचे काम हिंदी करते आहे.’’
हिंदी शब्द सिंधूचे लोकार्पण
यापूर्वी हिंदी भाषेतील शब्दांचा शब्दकोश प्रकाशित केला होता. या संमेलनात नव्या शब्दांची भर घालून हिंदी शब्द सिंधू या शब्दकोशाचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. त्यामध्ये ३ लाख ५१ हजार शब्द आहेत. पारंपरिक शब्दांचाही यामध्ये समावेश केला आहे. हा पूर्णपणे डिजिटलवर उपलब्ध असून, त्यामध्ये युनिकोड फॉन्टचा वापर केलेला आहे. हिंदी, इंग्रजीमध्ये शब्द शोधता येतो.
कोशिकाचे प्रकाशन-
राष्ट्रीय प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या (आकुर्डी) वतीने तयार केलेल्या कोशिका या पुस्तिकेचेही प्रकाशन झाले. यामध्ये देशभरातील प्राण्यांचे सर्वेक्षण झाले, त्याची माहिती आहे. तसेच प्राणीजगताविषयीचे लेख समाविष्ट करण्यात आले आहेत.