पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हिंदी विभागातील एमए प्रथम वर्ष प्रवेशाच्या ९० पैकी ४० जागा रिक्त राहिलेल्या आहे. या रिक्त जागांवर इतर विषयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणे आवश्यक असताना हिंदी विभागाकडून त्याला नकार देण्यात आला आहे. प्रवेशासाठी ४०० रुपये शुल्क व अर्ज स्वीकारल्यानंतर आता जागा रिक्त असूनही प्रवेश दिला जात नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे केली आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विषयांच्या एमए, एमएस्सी व एमकॉम आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. विद्यापीठाकडून काढण्यात आलेल्या एमए प्रवेशाच्या जाहिरातीमध्ये हिंदी विषयात एमए करायचे असेल तर आटर््स, कॉमर्स व सायन्स शाखेच्या कोणत्याही पदवीधर विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल, असे नमूद करण्यात आले होते. या जाहिरातीनुसार विद्यार्थ्यांनी ४०० रुपये शुल्क भरून प्रवेश मिळण्यासाठी अर्ज केले.मात्र, प्रत्यक्षात हिंदी विभागाकडून इतर विषयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. इतर सर्व विभागांमध्ये रिक्त राहिलेल्या जागांवर इतर विषयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असताना हिंदी विभाग मात्र बेकायदेशीरपणे नकार देत असल्याची तक्रार अर्जदार सचिन जगताप, श्रद्धा शुल्का यांनी केली आहे. हिंदी विभागाच्या निर्णयामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत असून कुलगुरूंनी यामध्ये हस्तक्षेप करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.
हिंदीच्या विद्यार्थ्यांची कुलगुरूंकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 3:15 AM