पुणे : कोंढव्यातील ॲमेनिटी स्पेसवर सांस्कृतिक भवनाच्या नावाखाली चोरपावलांनी होत असलेल्या अनधिकृत हज हाऊसला समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी विरोध केला. या मागणीला तसेच त्यांच्या भूमिकेला सर्व हिंदू संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.
तथाकथित हज हाऊस पुण्यात होऊ नये यासाठी हिंदू संघटनांनी वारंवार अशा प्रकारच्या प्रस्तावांना विरोध केलेला आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या अनधिकृत प्रस्तावाला कायमस्वरुपी विरोध राहणार असल्याचे समस्त हिंदू आघाडीचे प्रवक्ते सौरभ करडे व इतरांनी सांगितले. समस्त वडार समाजाचे मनोज गुंजाळ, ॲड. प्रदीप गावडे, ॲड. मोहनराव डोंगरे आदी या वेळी उपस्थित होते.
ॲमेनिटी स्पेसमध्ये कुठल्याही प्रकारचे धार्मिक बांधकाम होऊ नये, असा न्यायालयाचा आदेश आहे. असे बांधकाम करण्याचा अधिकार महानगरपालिकेला नाही. म्हणूनच होऊ घातलेले वारकरी भवनसुद्धा बांधण्याचा निर्णय रद्द झाला आहे. मिलिंद एकबोटे यांची मागणी कायद्याला धरुन असून त्यात कुठल्याही प्रकारची धार्मिक तेढ निर्माण करण्याचा उद्देश नाही. तरीही काही फुटीरवादी संघटनांनी एकबोटे यांच्या मागणीला विरोध दर्शवत त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करुन सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे, असे हिंदुत्ववादी संघटनांचे म्हणणे आहे.