पुणे : अभियंता मोहसीन शेख खून प्रकरणात अटकेत असलेला हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई तब्बल पाच वर्षांनी शनिवारी जामिनावर सुटणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना घातलेल्या अटींच्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्याची सुटका होईल, असे अॅड. मिलिंद पवार यांनी सांगितले.हडपसर येथे उसळलेल्या दंगलीत अभियंता मोहसीन शेख याचा खून झाला होता. त्या प्रकरणी देसाई याला जून २०१४मध्ये अटक करण्यात आली होती. देसाई याच्या वतीने जामिनासाठी अॅड. अभिजित देसाई व अॅड. मिलिंद पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून युक्तिवाद केला होता. महापुरुषांची फेसबुकवर बदनामी झाल्यानंतर तरुण उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले होते. कोणाच्या खुनाचा कट केला नव्हता किंवा कोणाच्याही खुनाचा उद्देश नव्हता; फक्त आंदोलन सुरू असताना दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली व अचानक मोठ्या प्रमाणावर दगडफेक सुरू झाली व त्यामधे दगड लागून मोहसीन शेख याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा युक्तिवाद करण्यात आला. तर, सरकार पक्षाचे म्हणणे होते, की या आरोपींनी जातीय दंगल घडवून शेख याचा खून केला आहे. बेकायदा जमाव जमवून मालमत्तेचे नुकसान केले आहे. तसेच मुस्लिम समाजाच्या विरोधात प्रचार केला व पत्रके वाटली, मुस्लिम समाजाचा बदला घेण्यासाठी चिथावणी दिली, मुस्लिम समाजाच्या व्यक्तीचा खून केला. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर उच्च न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलका देऊन देसाईचा जामीनमंजूर केला.भाषणांना बंदीआरोपी देसाईने खटला संपेपर्यंत हिंदू राष्ट्र सेनेचे काम करू नये, खटल्याशी संबंधित साक्षीपुराव्याशी छेडछाड करू नये, खटल्याशी संबंधित साक्षीदारांवर दबाव आणू नये, सुनावणी होईपर्यंत जाहीर भाषणे करू नयेत, असे प्रतिज्ञापत्र देसाईने उच्च न्यायालयात दाखल करावे,असे आदेश देत जामीन मंजूर केला आहे.अटींबाबतच्या प्रतिज्ञापत्रावर सही घेण्यासाठी प्रतिज्ञापत्र कारागृहात दाखल केलेआहे. त्यावर सही झालीआहे, असे अॅड. पवार यांनीसांगितले.
हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई जामिनावर सुटणार, ५ वर्षांनंतर जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 1:50 AM