पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेला अत्यंत महत्त्वाचा हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ प्रकल्प राज्य शासनाने ‘महत्त्वाकांक्षी नागरी परिवहन’ प्रकल्प म्हणून घोषित केला आहे. खासगी विकासकांच्या माध्यमातून हा प्रकल्प पीपीपी तत्वावर राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाकरिता हिंंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गालगतच्या व्यापारी-व्यावसायिक मूल्य असलेल्या अंदाजे ३० ते ३५ हेक्टर जमिनीची आवश्यकता भासणार आहे. हा प्रकल्प ‘बांधा, संकल्पन करा, आर्थिक पुरवठा करा, वापरा व हस्तातंरीत करा’ या तत्वावर मान्यता मिळालेली आहे.हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोच्या २३.३ किमी लांबीचा व २३ स्थानकांची मेट्रो रेल चार आॅथोरिटीवाइज म्हणजेच एमआयडीसी, पीएमआरडीए, पीसीएमसी व पीएमसीच्या परिक्षेत्रातून धावणार आहे. मेट्रोच्या २३ स्टेशनसाठी मेगापोलीस सर्कल, क्वाड्रन, डोल्हेर, इन्फोसिस फेज २, विप्रो टेक्नॉलॉजी फेज २, पाल इंडिया, शिवाजी चौक, हिंंजवडी, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, निकमार्क, रामनगर, लक्ष्मीनगर, बालेवाडी फाटा, बाणेरगाव, कृषी अनुसंधान, पुणे विद्यापीठ, आरबीआय, कृषी विद्यापीठ, शिवाजीनगर, सिव्हिलकोर्ट या जमिनीचा स्टेशनसाठी व कार डेपो व त्याच्या सेवा रस्त्यासाठी माण येथील जमिनीचा समावेश आहे.हिंंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या ताब्यातील जमिनीपैकी आवश्यक लागणारे जमिनीच्या क्षेत्राचा ताबा मिळावा याबाबतचे भूसंपादनाचे प्रस्ताव लवकरच जिल्हाधिकारी पुणे यांना सादर करण्यात येणार आहेत. शासनाने १८ जुलै २०१८ अन्वये घोषित केलेल्या निकडीचा प्रकल्प जाहीर झाल्याने जिल्हाधिकारी यांना शासन निर्णय १ जून २०१७ अन्वये प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जागेचे आगाऊ ताबे जिल्हाधिकारी यांच्याकडून पीएमआरडीएला देता येतील. त्यामुळे भूसंपादन प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होईल व हा प्रकल्प मार्गी लागण्यास चालना मिळेल. - किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए
हिंजवडी मेट्रो ‘महत्त्वाकांक्षी प्रकल्प’, पहिल्या टप्प्यातील २३.३ किमीचा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:53 AM