पुणे : हिंजवडीच्या आयटी हबची संजीवनी अशी ओळख होऊ लागलेल्या शहरातील शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो मार्गाचे रूळ बसवण्याच्या कामास शुक्रवारपासून सुरूवात करण्यात आली. सुरूवातील डेपोमध्ये चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी झाल्यानंतर प्रत्यक्ष मार्गावर रूळ बसवण्याचे काम सुरू झाले.
हिंजवडीत आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांसाठी हा मेट्रो मार्ग खरोखरच संजीवनी ठरणार आहे. २३ किलोमीटर अंतराच्या या मार्गावर सध्या रस्त्यावरून प्रवास करताना कसरत करतच जावे लागते. त्याशिवाय प्रदुषण व अन्य अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. वाहनांच्या संख्येमुळे दररोज वाहतूकीची कोंडी होते ती वेगळीच. हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो मार्गा या सगळ्या समस्यांवरचा उपाय ठरणार आहे. संपूर्ण मेट्रो मार्ग उन्नत (इलेव्हेटेड) आहे. त्यावर २३ स्थानके आहेत. खांब उभारणीचे काम आता जवळपास पूर्ण झाले असून स्थानक उभारणीचे काम वेगात सुरू आहे. शुक्रवारी यात आणखी एक जास्तीचे पाऊल टाकण्यात आले व प्रत्यक्ष मार्गावर रूळ बसवण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ('पीएमआरडीए') च्या संनियंत्रणात हे काम सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर सुरू आहे. खासगी कंपनीने निविदेद्वारे हे काम घेतले असून कामाच्या प्रत्यक्ष नियंत्रणासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे. खासगी कंपनीने काम पूर्ण केल्यानंतर त्यांच्याकडेच पुढील ३५ वर्षांसाठी या मेट्रोच्या संचलनाची जबाबदारी देण्याचा करार करण्यात आला आहे.
शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो प्रकल्पाचे सहयोगी एकॉम (AECOM) आणि एसजीएस (SGS) च्या सजग नजरेखाली रुळांच्या विविध प्राथमिक चाचण्या घेण्यात येत आहेत. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या २३.३ किमी मार्गासाठी रेल ट्रॅकची एकूण आवश्यकता, त्यांचे स्केलिंग, या रुळांची देखभाल अशा अनेक गोष्टींचे नियोजन सुरू आहे. सुरक्षेच्या बाबतीत काटेकोरपणे लक्ष दिले जात आहे.
आलोक कपूर- मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड