पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (PMRDA) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या कामाचा शुभारंभ नवारात्रीच्या मुहूर्तांवर करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार यांनी सोमवारी मेट्रोसह जिल्ह्यातील अन्य सर्वच प्रकल्पाच्या भूसंपादनाचा आढावा घेतला.
पुणे महापालिकेच्या मेट्रो प्रकल्पानंतर त्वरीत पीएमआरडीएच्या वतीने हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. परंतु तीन-चार वर्षांचा कालावधी लोटला तरी अद्यापही प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही. अजित पवार यांनी गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रकल्पांचा दर महिन्याला आढावा सुरू केला आहे. कोरोनामुळे गेले दीड वर्षे सर्वंच प्रकल्पांची कामे रखडली होती. परंतु जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी कोरोनासोबतच विकास कामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या कामाला पुढाकार देण्यास सुरुवात केली. यामुळेच गेल्या एक वर्षात सतत पाठपुरावा करून हिंजवडी ते शिवाजीनगरसाठी आवश्यक असलेले भूसंपादन ९७ टक्के पूर्ण केले. यामुळेच आता मेट्रोचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार आहे.
३ वर्षे ४ महिन्यात काम पूर्ण होणार या प्रकल्पाचे काम टाटा- सिमेन्स या कंपनीला देण्यात आले आहे. २४ किमी मेट्रो लाईन तयार करण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागतो. परंतु हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा प्रकल्प तीन वर्षे चार महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ठरलेल्या मुदतीत हे पूर्ण करण्याचे संबंधित कंपन्यांनी मान्य केले आहे.
मेट्रो, रिंगरोड, मेडिकल कॉलेज सर्वच प्रकल्पांचा आढावा
''उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार दर महिन्याला जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घेतात. त्याप्रमाणेच सोमवार (दि.27) रोजी देखील त्यांनी आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी काही अडचण नाही ना याचा आढावा घेतला. याशिवाय रिंगरोड, पालखी मार्ग, मेडिकल कॉलेजसह अन्य सर्वच प्रकल्पांचा आढावा घेतला. असं जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितलं.''