केडगाव - श्रीक्षेत्र संगम (ता. दौंड) येथील संतराजमहाराज संस्थानाचा आषाढी वारीचा पालखीरथ हिरा-तुरा ही बैलजोडी ओढणार आहे. पारगाव (ता. दौंड) येथील मारुती बोत्रे यांना या वर्षी बैलजोडी पालखीरथास जुपण्याचा मान संस्थानाच्या विश्वस्तांनी दिला.बोत्रे यांनी ही बैलजोडी नानगाव येथील बाळासाहेब महिपती शितोळे यांच्याकडून किंमत न ठरवता देईल त्या मोबदल्यामध्ये विकत घेतली. बैलजोडी खिलार जातीची, पांढरीशुभ्र व रुबाबदार आहे. सदर बैलजोडीचे पूजन उद्योजक माऊली ताकवणे व त्यांच्या पत्नी मीना यांच्या हस्ते झाले. पूजनानंतर मारुती बोत्रे यांनी सदर बैलजोडी संतराजमहाराज संस्थानाचे अध्यक्ष सुरेशमहाराज साठे यांच्याकडे सुपूर्त केली.भाविकांसाठी गणेशमहाराज शिंदे यांचे कीर्तन झाले. या वेळी संस्थानाचे अध्यक्ष सुरेशमहाराज साठे म्हणाले, की पालखी सोहळ्याचे हे ५१ वे वर्ष असून यंदा सोहळा ९ जुलै रोजी पंढरपूरकडे रवाना होईल. चालू वर्षी देलवडीचा मुक्काम रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला संभाजी खळदकर, विकास शेलार, सचिन शिंदे, विजय शिवरकर, सुदाम कोंडे, नारायण जगताप, सर्जेराव चोरमले, सुरेश थोरात, विष्णुपंत नलगे, पोप्ांट ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पालखीरथाला हिरा-तुराची जोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 2:18 AM