पुणे जिल्ह्यात गेल्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने भातपिकाचे उत्पादन चांगले आले होते. परंतु परतीच्या पावसाने आपला मुक्काम लांबविला व हातातोंडाशी आलेल्या भातपिकावर अवकाळीने घाला घातला. तयार होवू लागलेले भातपीक भीजून आदिवासी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी खाचरांचे नुकसान झाल्याने वर्षभर काबाडकष्ट करून केलेली आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनाचा मुख्य आधार समजली जाणारी भातशेती वाया गेली. हिवाळ्यातील हवामान बदलामुळे पठारी भागातील रब्बी पीकांचा हंगामही वाया गेला.
आदिवासी शेतकऱ्यांना हक्काचे आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे साधन म्हणजे हिरडा, मात्र यंदा हिरड्याची झाडे फळे धारणेच्या अवस्थेत आसतानाच पुणे जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात गारपीट व वादळीवाऱ्यांसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. याचा फटका आंबेगाव तालुक्याच्या आहुपे, पाटण व भीमाशंकर खोऱ्यासह जुन्नर व खेड तालुक्यातील आदिवासी भागाला बसला. यामुळे अनेक ठिकाणी हिरड्याचा बहर व कोवळी लगड लागलेली हिरड्याची फळे झटकून पडली.
अवकाळी पावसामुळे यंदा हिरड्याच्या उत्पादनाचे प्रचंड नुकसान झाले. आर्थिक उत्पन्नाचे हक्काचे साधनच हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी चिंता निर्माण झाली आहे. शासनाची हिरडा खरेदी केंद्रही बंद असल्याने आदिवासी शेतकरी अडचणीत सापडला आहे.
--
चौकट
उन्हाळ्यातही संकट होतेतच
--
उन्हाळ्याच्या दिवसात आदिवासी शेतकरी जंगलातील आंबा, करवंदे, जांभळे, आवळे व इतर फळे जमा करून बाजारात विकतो. यातून आदिवासींना बऱ्यापैकी पैसे मिळतात.
कोरोना महामारीमुळे ना मोलमजूरी करता आली, ना बाजारहाट. यामुळे आदिवासी बांधवांची रोजीरोटीच हिरावली आहे. जंगलावर अवलंबून असलेले पोटही यंआ रिकामेच राहिल्याने आदिवासी शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. एकामागून एक आलेल्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करता करता आदिवासी शेतकरी पूर्णत: मेटाकुटीस आला आहे. पावसाळ्यात भातशेतीचे नुकसान तर उन्हाळ्यात गारपीट, वादळ व अवकाळी यामुळे पुणे जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी पूर्णत: हतबल झाला असून नैसर्गिक आपत्तीमुळे उध्वस्त झाला आहे.
--
फोटो क्रमांक : २३ डिंभे शेतकरी संकटात
फोटो ओळी : कोरोनाचे संकट त्यातच वर्षभरात एकापाठोपाठ एक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे रोजीरोटी हिरावल्याने आदिवासी शेतकरी यंदा हतबल झाला असून प्रचंड अर्थिक पेचात सापडला आहे. (छायाचित्र-कांताराम भवारी.)