ठळक मुद्देमाणुसकी प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
दीपक कुलकर्णी पुणे: स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीसुध्दा ते रस्ते, हॉटेल, बसस्थानके, सिग्नल, मंदिरे, दुकाने, रेल्वे स्टेशन, टपऱ्या, अशा अनेक ठिकाणी त्यांच्याच कामात व्यस्त असतील. त्यांच्या भयभीत,अत्याचारित, अपमानित पावलांच्या वाटेवर त्यांच्या पंखात जिद्द, सामार्थ्य, आत्मविश्वास, शिक्षण गरुडझेपेची उभारी देण्याचे आणि त्यांच्या निरागस डोळ्यात भवितव्यातील स्वातंत्र्याची स्वप्नंच पेरण्याचे काम तो आणि त्याची संपूर्ण टीम ‘माणुसकी’ जपत करत आहे. त्यांचे नाव लेखक व अभिनेता आशिष निनगुरकर व त्याच्या टीमचे माणुसकी प्रतिष्ठान..! चौदा वर्षांखालील मुलांना कामावर ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण हा कायदा अस्तित्वात येवून सुध्दा कितीतरी वर्ष लोटली आहे. तरी देखील टपरी, हॉटेल,चप्पल दुकान,फळवाले, मंडई रेल्वे स्टेशन अशा अनेक ठिकाणी हे बालकामगार प्रचंड संख्येने आढळतात. मध्यंतरी एका आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणात सुध्दा भारतात बालमजुरीचा प्रश्न भीषण स्वरुप धारण करुन कितीतरी चिमुकल्यांचे आयुष्य दिशाहीन व उध्वस्त करुन टाकत असल्याचे पुढे आले होते. परंतु, समाजात या दिशाहीनांना पदरात घेणारे सामाजिक संस्था, माणसे आपआपल्या परीने करत आहे. परंतु, कुणाच्या आयुष्यात कधी काय टर्निंग पाँईंट येईल हे सांगता येत नाही. तसाच एक प्रसंग आशिषच्या आयुष्यात आला. कोल्हापूरला चित्रपटाचे लोकशन शोधण्यासाठी निघालेला असताना चहाच्या टपरीवर घडला. तिथे एक १२-१३ वर्षांचा मुलगा दिसतो ज्याला स्वत:चे आई वडील देखील माहिती नाही. दुसरा प्रसंग सातारा रस्त्यावरील आलिशान हॉटेलमधल्या दारुड्या वडीलांमुळे मध्यरात्री रस्त्यावरच्या वाहनांना जेवण्यासाठी केविलवाणा चेहरा घेवून उभा राहिलेला ११ वर्षांचा चिमुकला... दोन्ही प्रसंग बहुदा आशिषकडून उत्तर मागण्यासाठीच त्याच्या समोर घडले असावे. त्यामुळेच चहाच्या टपरी व हॉटेलमधील मुलाकडे चौकशी केली असता जे वास्तव समजले ते भयावह होते. त्याला ते अस्वस्थ करुन गेले. यातूनच आशिषने त्यानंतर बालमजूर असणारे अनेक ठिकाणे पालथे घातली. त्याचवेळी त्याने या समस्येला वाचा फोडण्याचा निर्णय घेतला. आणि हे भयाण प्रसंगाना कथानकात रुपातंरित केले. मग काही मित्रांना एकत्रित आणत याच कथानकावर आधारित चित्रपट करण्याचे ठरविले. यातून बालमजुरीवर तिखट भाष्य करणारा‘रायरंद’ हा चित्रपट तयार केला. ज्याने विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये वाहवा मिळविली. पण यानंतरही त्याला बालकामगारांच्या समस्येने स्वस्थ बसू दिले नाही. मग त्याने माणुसकी प्रतिष्ठानची निर्मिती केली. यातूनच ठिकठिकाणाहून १२ ते १५ मुले व मुली अशी बालकामगारांची सुटका केली. त्यांना वाऱ्यावर न सोडता आर्थिक स्थैर्य संपन्न्ता असलेल्या व्यक्तींना एकत्र जोडत या मुलांची अन्न, वस्त्र, निवाऱ्यासह शिक्षणाची व्यवस्था करण्याच्या कार्यात सहभागी करुन घेतले.यातील काही मुले दहावी , नववी , सातवी यांसारख्या अनेक परीक्षांमध्ये चांगले मार्क मिळवून यशस्वी होत आहे. एका मुलाला दहावीत ९० टक्के मार्क मिळाल्याचे सांगतानाचा आनंद आशिषच्या चेहऱ्यावर लपला नाही. याबाबत आशिष निनगुरकर म्हणाला, दोन प्रसंगासह तिसरा अनुभव जो मला कमालीचा हादरवून गेला तो म्हणजे एका प्रसिद्ध मंदिराच्या बाहेर एक लहान मुलगा देवाची मूर्ती आणि फोटो विकण्याचे काम करत होता.त्या देवळात जाऊन दर्शन घेण्याऐवजी त्या मुलाच्या मागे गेलो. तेव्हा त्याला रोजंदारीवर कामाला ठेवले असल्याचे कळले. राजस्थान येथून पळून आलेला हा मुलगा महाराष्ट्रात एका प्रसिद्ध धार्मिक ठिकाणी देवाचे फोटो विकत होता. राहण्या- खाण्यासह त्याला रोज १०० रुपये मिळत होते. १० ते ११ वय असलेला या मुलाला मराठी पण येत नव्हते. पण त्याच्या घरच्यांशी संपर्क साधून मी त्याला त्याच्या गावी पाठवले.हा मुलगा माझ्या नजरेत आला म्हणून ठीक आहे. परंतु, असे कित्येक मुले गाव तालुका. जिल्हा आणि राज्य सोडून घराबाहेर पडतात. काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे तर काही लैंगिक अत्याचाराचे पीडित ठरतात.पण या भीषण परिस्थितीकडे आपण जोपर्यंत गांभीर्याने वाहत नाही तोपर्यंत हा प्रश्न संपल्यात जमा होणार नाही. त्यासाठीच ही धडपड सुरु आहे. माणुसकी प्रतिष्ठानसह अनेक बालकामगारांना आम्ही मूळ प्रवाहात परत आणू शकलो याचे समाधान आहे. या प्रतिष्ठानमध्ये आशिषसह रणजित कांबळे,प्रतिश सोनवणे,गोपाळ शर्मा,गजानन चलमल, सिराज खान,मनोज मेहेत्रे,सुनील जाधव,संतोष खानदेशी, सुखदेव पाटील,सिद्धेश दळवी,प्रकाश भागवत व विशाल जाधव आदी मंडळी काम करत आहे.