पुणे : पुण्यातील रिक्षावाले उद्धट असतात अशी टीका नेहमी केली जाते. मीटर प्रमाणे येत नाहीत, लांबचे भाडे स्विकारत नाहीत अशा अनेक तक्रारी केल्या जातात. परंतु मंगळवार पेठेतील स्वप्नाली माेरे यांना पुण्यातील एका रिक्षावाल्याचा एक वेगळाच अनुभव अाला. रिक्षात विसरलेली अडीच लाख रुपयांच्या माैल्यवान वस्तू असलेली बॅग रिक्षावाल्याने प्रामाणिकपणे माेरे यांना परत करुन अापल्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले अाहे. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे काैतुक करत फरासखाना पाेलीस स्टेशनचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक किशाेर नावंदे यांनी शाल व श्रीफळ देऊन त्याचा सत्कार केला.
स्वप्नाली बाळु माेरे (रा. मंगळवार पेठ) या अापल्या नातेवाईक व लहान मुलासह माहेरी गेल्या हाेत्या. साेमवारी दुपारी त्या एसटीने बिड येथून शिवाजीनगर येथे उतरल्या. तेथून त्या हनुमंत माने यांच्या रिक्षाने अापल्या घरी मंगळवार पेठे येथे अाल्या. उतरल्यानंतर काही वेळाने अापली बॅग रिक्षात विसरल्याचे त्यांच्या लक्षात अाले. त्या बॅगेत अर्धा ताेळ्याची दाेन मंगळसुत्रे, एक ताेळ्याचे कानातील कर्नफुले, एक ताेळ्याची साेन्याची अंगठी, 20 ताेळे चांदीचे दागिने, चार हजार रुपये राेख रक्कम, माेबाईल व हातातील घड्याळ अशा एकून दाेन लाख पन्नास हजार रुपयांच्या माैल्यवान वस्तू हाेत्या. याबाबत माेरे यांनी गाडीतळ पाेलीस चाैकी येथे तक्रार केली. तात्काळ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ज्या ठिकाणी माेरे या उतरल्या त्या ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज तपासले. त्याद्वारे रिक्षाचा नंबर मिळवला. तसेच रिक्षा स्टॅंण्डवर त्या रिक्षाबाबत माहिती घेतली.
दरम्यान रिक्षात विसरलेल्या बॅगेतील माेबाईलवर पाेलीस सतत फाेन करत रिक्षाचा मागाेवा घेत हाेते. काही वेळाने रिक्षा चालकाने फाेन उचलला. पाेलिसांनी ती बॅग फरासखाना पाेलीस स्टेशनला जमा करण्यास रिक्षावाल्याला सांगितले. रिक्षा चालकाने प्रामाणिकपणे ती बॅग पाेलीस स्टेशनला जमा केली. बॅगची पाहणी केली असता सर्व वस्तू सुरक्षित हाेत्या. रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणावर खूष हाेऊन पाेलिसांनी त्या रिक्षाचालकाचा सत्कार केला.