पुणे : मुंबईत एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी 'मी आजही मुख्यमंत्री आहे असंच मला वाटतं'' विधान केलं होत. त्यावर राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे. अनेक राजकीय नेते या वक्तव्यावर टीका टिप्पणी करू लागले आहेत. त्यातच पुण्यात खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी सुद्धा या विधानावर देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. असं विधान करणाऱ्यांचं आयुष्य स्वप्न बघण्यातच जावं असं राऊत म्हणाले आहेत. पुण्यातील महावीर जैन महाविद्यालयात ते एका कार्यक्रमासाठी आले असता ते बोलत होते.
राऊत म्हणाले, कधीकधी लोकांना वाटतं अजूनही यौवनात मी हे नाटक फार गाजलं. रंगमंचावर आम्हालाही दिल्लीत गेल्यावर असं वाटतं त्यांची भावना योग्य आहे. स्वप्नात रममाण व्हावं माणसाने, चांगली स्वप्ने पहावीत, स्वप्नांना बळ असावं, त्यांच्या पंखाना ताकद यावी माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, त्यांचं आयुष्य स्वप्न बघण्यात जावं. असा टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला आहे.''
काय म्हणाले होते फडणवीस
गेले दोन वर्ष सातत्याने राज्यभर फिरून लोकांशी बोलतोय. त्यांचं प्रेम अजिबात कमी झालेले नाही. माणूस कोणत्या पदावर आहे ते महत्त्वाचे नसून तो काय काम करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. मला जनतेने कधी मी मुख्यमंत्री नसल्याचे जाणवू दिले नाही. त्यामुळे मी आजही मुख्यमंत्री आहे असंच मला वाटतं. विरोधी पक्षनेता म्हणून मी उत्तम करतोय. ज्या दिवशी जनतेचा आशीर्वाद मिळेल, त्या दिवशी पुन्हा इथं देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येईन,' असंं फडणवीस म्हणाले होते.
आतापर्यंत शिवसेनेचा महापौर नाही यांची खंत वाटते
पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये पुढचा महापौर शिवसेनेचा असणार असा पक्का विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ''महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणूक लढणार आहे. राज्यात गेली दोन वर्षे ठाकरे - पवाराचांच बोलबाला हे आगामी काळातही तो दिसेल. पण आतापर्यंत शिवसेनेचा महापौर झालेला नाही याची आम्हाला खंत वाटत असल्याचे ते म्हणाले आहेत.''