पुणे : धनकवडीतील सात मंडळांनी ऐतिहासिक पाऊल उचलले असून, गणेश चतुर्थीच्या दिवशी सातही मंडळांचे बाप्पा एकाच रथात बसवून त्यांची पहिल्या दिवशीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिक बजेट मोठ्या प्रमाणावर वाचले आहे. त्या बजेटवर आम्ही गणेशोत्सवातसामाजिक उपक्रम राबवणार आहोत, असेही कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.
धनकवडी भागातील केशव कॉम्प्लेक्स मित्रमंडळ, जय महाराष्ट्र मित्रमंडळ, अखिल नरवीर तानाजीनगर मित्रमंडळ, पंचरत्नेशवर मित्र मंडळ, एकता मित्रमंडळ, अखिल मोहननगर मित्रमंडळ ट्रस्ट, विद्यानगरी मित्रमंडळ या मंडळांनी हा निर्णय घेतला आहे.
गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा झाला. यंदा कोरोना आटोक्यात आल्याचे चित्र दिसू लागल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्याची परवानगी दिली. त्यामुळे मंडळे तयारीला लागली आहेत.
महापुरुषांचे फोटोही रथावर लावण्यात येणार
गणेश चतुर्थीच्या दिवशी ही सात मंडळे एकाच रथावर गणरायाची मूर्ती ठेवून मिरवणुकीला सुरुवात करणार आहेत. देशाचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव या विषयावर आधारित देखावा रथावर करण्यात येणार आहे. तसेच महापुरुषांचे फोटोही रथावर लावण्यात येणार आहेत. पहिल्या दिवशी त्या भागातील हजारो गणेशभक्त पारंपरिक वेशभूषेत या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तसेच ढोल पथकांच्या वादनाबरोबरच मिरवणुकीला सुरुवात होणार असल्याचे मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
सहमताने एकत्रित मिरवणूक काढण्याचे ठरवण्यात आले
कोरोना काळातही आम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. आमच्या येथे मंडळे सण, उत्सव, अनेक उपक्रम एकत्र साजरे करतात. त्याप्रमाणेच आम्ही धनकवडीच्या गुलाबनगर भागातील मंडळांनी मिरवणूक एकत्र काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सहमताने एकत्रित मिरवणूक काढण्याचे ठरवण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.