राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दहावीचा निकाल जाहीर केला. ते म्हणाले, कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यामुळे शासन निर्णयानुसार राज्य मंडळाऐवजी शाळांनी घेतलेल्या विविध परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे दहावीचा निकाल तयार करण्यात आला.
राज्यातील नऊ विभागीय मंडळांतर्गत एकूण १५ लाख ७५ हजार ८०६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ७५ हजार ७५२ विद्यार्थ्यांचे गुण शाळांकडून प्राप्त झाले. त्यातील १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
राज्यातील तब्बल १ लाख ४ हजार ६३३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. तर ४५ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६१ हजार २९४ एवढी आहे. राज्यातील ४ हजार ९२२ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच ९१६ विद्यार्थी पुनर्रपरीक्षेसाठी पात्र ठरले असून, ३६८ विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाली आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
------------------------------
निकालाची वैशिष्ट्ये :
-राज्यातील १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण
-एकूण ७२ विषयांपैकी २७ विषयांचा निकाल १०० टक्के
-राज्यातील ९५७ विद्यार्थ्यांना मिळाले १०० टक्के गुण
-दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९७.८४ टक्के
-राज्यातील २२,७६७ शाळांचा निकाल १०० टक्के; तर ९ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला.
-विद्यार्थिनींचा निकाल विद्यार्थ्यांपेक्षा ०.०२ टक्क्यांनी अधिक
--------
विभागीय मंडळनिहाय निकाल
पुणे : ९९.६५
नागपूर : ९९.८४
औरंगाबाद : ९९.९६
मुंबई : ९९.९६
कोल्हापूर : ९९.९२
अमरावती : ९९.९८
नाशिक : ९९.९६
लातूर : ९९.९६
कोकण : १००.००
----------------
राज्य मंडळातर्फे प्रत्यक्ष परीक्षा घेऊन जाहीर केलेला निकाल आणि शाळांच्या माध्यमातून तयार झालेला निकाल यात काही प्रमाणात फरक असणार आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदा निकालात ४.६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार असून, सोमवारपासून प्रक्रियेला सुरुवात होईल.
- दिनकर पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
------