पुणे : मुंबई - पुणेमहामार्गावरील असणारा ब्रिटीशकालीन अमृतांजन पूल आता येत्या काही दिवसांत पाडण्यात येणार आहे. नेहमीच्या रहदारीचा, वाहतुकीचा रस्ता असल्याने तो पूल पाडणे शक्य होत नव्हते. मात्र सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात तो पाडण्यात येणार आहे. अशी माहिती ठाणे परिक्षेत्राचे महामार्ग पोलीस अधीक्षक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. काळाच्या ओघात अमृतांजन पूल अधिक जीर्ण झाला असून तो अनेक दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलाखालून द्रुतगती महामार्गावर वळण घेण्यासाठी अरुंद रस्ता आहे. यामुळे मोठया प्रमाणावर अपघात झाले आहेत. या कारणामुळे हा पूल पाडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रायगडचे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असून त्यानुसार त्यांनी 31 मार्च रोजी आदेश काढला आहे. त्यात हा पूल पाडण्याची परवानगी रस्ते विकास महामंडळाला देण्यात आली आहे.यामुळे 4 ते 14 एप्रिल या कालावधीत स्फोटकांच्या मदतीने हा पूल पाडण्यात येणार आहे. असा उल्लेख अधीक्षक यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात करण्यात आला आहे. तसेच 4 ते 14 एप्रिल या काळात मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावरून जाणाऱ्या पुणे लेनवरील वाहतूक अंडा पॉईंट वरून जुन्या महामार्गावरून खंडाळा लोणावळा शहरातून द्रुतगती महामार्गावर येईल. आणि मुंबई मार्गावरील वाहतूक लोणावळा येथून बाहेर पडून जुन्या मुंबइ पुणे महामार्गावरून लोणावळा खंडाळा शहरातून अंडा पॉईंट पर्यत वळविण्यात येणार आहे. अशाप्रकारे द्रुतगती मार्गावर एकूण 10 किमी अंतरासाठी पयार्यी मार्गांने वाहतुक वळविण्यात येणार असल्याचे महामार्ग पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुंबई- पुणे महामार्गावरील 'ऐतिहासिक अमृतांजन' पूल होणार जमीनदोस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 3:56 PM
हा पूल अनेक अपघातांना ठरला होता कारण...
ठळक मुद्दे4 ते 14 एप्रिल या कालावधीत स्फोटकांच्या मदतीने हा पूल पाडण्यात येणार नेहमीच्या रहदारीचा, वाहतुकीचा रस्ता असल्याने तो पूल पाडणे होत नव्हते शक्य होत.