पुणे : ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या धोरणावर आधारित हवेली तालुक्यातील वडकी येथील ऐतिहासिक मस्तानी तलावातील गाळ पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) काढला. त्यामुळे तलावाच्या पाणीपातळीत २५ टक्के वाढ झाली आहे. या पाण्यावर चार गावांचीतहान भागून पाण्याचा वापर शेतीसाठी व जनावरांसाठी करता येणार आहे.
इसवी सन १७२० मध्ये ४ एकर क्षेत्रात असलेल्या या तलावातून २६,६०० घनमीटर (क्यूबिक मी.) गाळ काढला आहे. मस्तानी तलावाच्या पाझरातून जवळपास आजूबाजूच्या परिसरातील ७० विहिरींना यामुळे पाणी मिळू शकते. हा गाळ काढल्यानंतर तेथील शेतांना हा गाळ टाकण्यात आला आहे. पालकमंत्री निधीतून ३ कोटी या तलावासाठी मंजूर केले होते. यंदा या भागात पाऊस कमी झाल्याने २५ टक्के पाणीसाठा झाला आहे. भविष्यात पाणीटंचाई जाणवणार नाही. तलावाचे नूतनीकरण करून पर्यटनाला चालना मिळण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले आहे.