प्रज्ञा केळकर- सिंग
पुणे : मराठी साहित्याच्या दालनामध्ये ऐतिहासिक कादंबरीला विशेष स्थान आणि लोकप्रियता मिळते. मात्र, दर्जेदार अनुवादकांची कमतरता, ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास आणि चिंतनगर्भतेचा अभाव, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशकांची उदासीनता यामुळे मराठी साहित्य मोठ्या प्रमाणात इंग्रजी भाषेमध्ये अद्याप पोहोचू शकलेले नाही. त्यातही महाराष्ट्रात वर्षानुवर्षे ‘वाचनीय’ आणि ‘बेस्ट सेलर’ ठरणाऱ्या ऐतिहासिक कादंबऱ्यांना सातासमुद्रापार पोहोचण्याची अद्याप प्रतीक्षाच करावी लागत आहे. बंगाली, तमीळ, कन्नड साहित्याची वाहवा होत असताना मराठी साहित्यकृती आजही मागे का? असा प्रश्न आंतरराष्ट्रीय अनुवाद दिनानिमित्त पुढे आला आहे.श्रीमान योगी, राधेय, मृत्युंजय, छावा, स्वामी, युगंधर अशा ऐतिहासिक कादंबºयांनी वाचकांच्या अनेक पिढ्या घडविल्या. शालेय, महाविद्यालयीन वयापासून बहुतेकांनी वाचनाची सुरुवात याच साहित्यकृतींपासून केली. पूर्वीच्या काळातील सांस्कृतिक-राजकीय-सामाजिक घडामोडी, मानवी नातेसंबंधांची गुंतागुंत विस्तृत स्वरूपात मांडताना या साहित्यकृतींमधून ऐतिहासिक पट मांडला गेला. आजही या कादंबऱ्यांचा खप मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, ‘राधेय’, ‘स्वामी’, ‘युगंधर’ अशा मोजक्या कादंबऱ्या वगळता इतर साहित्यकृती इंग्रजी भाषेचा दरवाजा ठोठावू शकलेल्या नाहीत.प्रकाशक अरुण जाखडे म्हणाले, ‘‘इंग्रजीतील साहित्य मराठीत अनुवादित होते; मात्र त्याउलट परिस्थिती खूप कमी वेळा दिसते. ‘आम्हाला इंग्रजीतला कर्ता आला, कर्म आले, क्रियापद आले; फक्त इंग्रजी बोलता आले नाही’, असे पु.ल. म्हणायचे. इंग्रजीवर प्रभुत्व असणारे अनुवादकच आपल्याकडे नाहीत. त्यामुळे उत्कृष्ट अनुवाद होत नाही. प्रकाशकांकडे जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची लागणारी यंत्रणा, व्यवस्था नाही. मात्र, आता तरुण पिढीकडून अपेक्षा आहेत. तिने मराठी साहित्याचे मानदंड इंग्रजीच्या खिडकीत पोहोचवण्यास प्रयत्न करायला हवेत.’’अनुवादिका विजया देव म्हणाल्या, ‘‘पौैराणिक कादंबरीचा विषय, आवाका बारकाईने समजून घ्यावा लागतो. कारण, अनेक संदर्भ महाकाव्यांकडे जाणारे असतात. अनुवादकांची या साहित्यकृतींकडील ओढ वाढली पाहिजे. इतर प्रादेशिक भाषकांइतकी अस्मिता मराठी भाषकांमध्ये आहे का, हाही चिंतनाचा विषय आहे. जागतिक दर्जा गवसण्यासाठी खूप प्रयत्न हवेत.’’इंग्रजी प्रकाशकांसमोरचा आपला अॅप्रोच कमी पडतो आहे. बहुतांश प्रकाशकांना मराठीतून इंग्रजीतील अनुवादाची प्रक्रियाच कळालेली नाही. अनुवादासाठी वेगळी माणसे, विभाग तयार करावे लागतात. यंत्रणा सज्ज करावी लागते. याबाबत प्रकाशकांनी गांभीर्याने विचार करायला हवा - सुनील मेहता, प्रकाशक...........ऐतिहासिक कादंबऱ्यांचा अनुवाद करताना मूळ आशय, चिंतनगर्भतेला धक्का लावून चालत नाही. साहित्य अकादमीने अनेक अनुवाद केले आहेत; पण ते वाचकांपर्यंत पोहोचतच नाहीत. ज्ञानपीठ हे भारताचे नोबेल, तर साहित्य अकादमी हे बुकर आहे. मात्र, तशा पद्धतीचे ग्लॅमर भारतीय साहित्यात का निर्माण होत नाही? साहित्य अकादमीच्या अनुवादित पुस्तकांचे वितरण सरकारी यंत्रणेप्रमाणे केले जाते. बऱ्याचदा अनुवादाचा दर्जा, मुखपृष्ठ याबाबत तडजोड केली जाते. योग्य अनुवादक, प्रकाशकांच्या अभावी आता बरेच मराठी लेखक इंग्रजीतच लेखन करू लागले आहेत - संजय सोनवणी, लेखक