पुणे : शहरामध्ये ऐतिहासिक वास्तू मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे पुण्याला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, या सगळ्याच वास्तूंकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने त्यांचा ऱ्हास होत असल्याचे दिसून येत आहे. या महत्त्वपूर्ण वास्तूंचा स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. लोकमत टीमने केलेल्या पाहणीमध्ये या ठिकाणी दारूच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या, सिगारेटचे तुकडे, गुटखा पुड्या, तंबाखू खाऊन लाल केलेल्या भिंती दिसून आल्या आहेत. शहरामध्ये रोज अनेक पर्यटक या ऐतिहासिक वास्तूंना भेट देतात. त्याच्या माध्यमातून आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणात होते. पर्वती, शनिवारवाडा, विश्रामबागवाडा, पेशवेकालीन घाट, नानासाहेब पेशवे समाधी, लालमहाल या मुख्य व पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या वास्तू आहेत. या वास्तूकंडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
नानासाहेब पेशवे समाधी मुळा नदीच्या काठावर उभारलेल्या नानासाहेब पेशवे यांच्या समाधीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. समाधीजवळ स्वच्छता नाही. येथे मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. येथे मोठा कचऱ्याचा ढिगारा आहे. समाधीची नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे.विश्रामबागवाडाविश्रामबागवाड्यातही अस्वच्छता दिसून आली. वाड्याच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात जाहिरातीचे पोस्टर लावलेले आढळून आले. त्यामुळे त्याचे विद्रूृपीकरण होत आहे. प्रवेशद्वाराजवळ दारूची बाटली आढळून आली. तसेच वाड्याच्या भिंतीजवळही मोठ्या प्रमाणात बाटल्यांच्या काचा, प्लॅस्टिक बॅगा आढळून आल्या आहेत. ही बाब नक्कीच शोभनीय नाही. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत कसे करणार, हा मुख्य मुद्दा आहे. वाड्याकडे नियमित पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. पर्वतीपर्वती पुणेकरांसाठी आवडीचे ठिकाण आहे. येथे सकाळी आणि सायंकाळी अनेक जण फिरायला येत असतात. अनेक पर्यटकही येथे भेटी देतात. येथे पुरातन वस्तुसंग्रहालय आहे. पर्वतीचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. मंदिराच्या पाठीमागे कचरा टाकला जातो. त्यामुळे त्याची दुर्गंधी येते. येथे नियमित दारूच्या पार्ट्या होत असल्याच्या तक्रारी येतात. अनेक रिकाम्या बाटल्याही दिसून आल्या आहेत. शनिवारवाडाशहराची ओळख असलेल्या व पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या शनिवारवाड्याची अवस्थाही वाईटच आहे. येथे दररोज हजारो पर्यटक भेटी देतात. मात्र त्यांचे स्वागत करतात कचऱ्यांचे ढिगारे. येथील स्वच्छतागृह बंद पडल्यामुळे अनेक महाभाग येथेच विधी करतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. वाड्यातील पुतळ्याजवळ अनेक जण कचरा टाकताना आढळून आले. वाड्यात कचराकुंड्या ठेवलेल्या आहेत. मात्र, त्याचा वापर होताना दिसत नाही. माहितीफलकावर पुड्या खाऊन अनेक जण थुंकले असल्याने त्या दिसत नाहीत. भिंतीही लाल झाल्या आहेत. अनेक प्रेमवीर आपली नावे भिंतीवर लिहीत असतात. त्यामुळे वाड्यांचे मोठ्या प्रमाणात विद्रूपीकरण झाले.