पुणे - इतिहासात पंडित जवाहरलाल नेहरू यांना जेवढे महत्त्व दिले, तेवढे महत्त्व सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस आणि वीर सावरकरांना मिळाले नाही. आता नेहरूंना विसरून जाण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, नव्याने इतिहासाचे पुस्तक लिहिले जात आहे. आमचे पुढील काम खरा इतिहास लिहून लोकांसमोर आणण्याचे असेल, असे वक्तव्य भाजपाचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी रविवारी केले. तसेच पुढील काळात हिंदुत्वाची लाट येईल, असेही त्यांनी नमूद केले.स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट, हिंदू हेल्पलाइन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित ‘मी सावरकर वक्तृत्व स्पर्धे’च्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. ‘राष्ट्रभक्त वीर सावरकर’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. या वेळी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंडे, ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय बर्वे, रणजित नातू, शैलेश काळकर, प्रवीण गोखले, अमेय कुंटे आदी उपस्थित होते. विविध गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूर येथील स्वरदा फडणीस या विद्यार्थिनीला महाविजेता म्हणून पारितोषिक प्रदान करण्यात आले.स्वामी म्हणाले, स्वातंत्र्याच्या लढाईत आधी मुस्लिम नंतर ब्रिटिशांविरोधात देशभरातील हिंदू एकजूट होऊन लढले. आजही लढत आहेत. त्यामुळेच देशात ८२ टक्के हिंदू आहेत. इतिहासाच्या पुस्तकात अनेकांची शौर्यगाथा आली नाही. लोकांपर्यंत ती पोहोचू दिली गेली नाही. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले. त्यांच्याव्यतिरिक्त पटेल, बोस व सावरकरांनीही विविध माध्यमातून नेतृत्व केले. पण इतिहासात नेहरूंएवढे महत्त्व त्यांना मिळाले नाही. त्यामुळे पुढील काळात खरा इतिहास लिहिणे हे आमचे काम असेल. त्यासाठी पुन्हा पाच वर्षे आम्हाला आणावे लागेल.सावरकरांनी लोकांमध्ये हिंदुत्वाची प्रेरणा जागृत केली. आता सावरकरांचे महत्त्व पटू लागले आहे. पण काँग्रेसने हिंदूंचे विभाजन करून सत्ता मिळविली. २०१४ मध्ये सर्व हिंदू एकत्र आल्याने आपली सत्ता आली. असे स्वामी यांनी सांगितले.सावरकरांवर अन्यायदेशातील जनतेमध्ये हिंदू चेतना व प्रखर राष्ट्रवाद जागविण्याचे काम सावरकरांनी केले. पण काँग्रेसने त्यांना गांधीहत्येचा भाग करून त्यांच्यावर अन्याय केला. खरा इतिहास पुढे येऊ दिला नाही. सावरकरांनी संपूर्ण जीवनाचा देशासाठी त्याग केला, तरीही त्यांच्यावर अन्याय झाला. त्यांना न्याय देण्याची सुरुवात आता झाली आहे, असे स्वामी यांनी सांगितले.
इतिहासाचे पुनर्लेखन अजेंड्यावर - सुब्रह्मण्यम स्वामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 3:35 AM