पुणे : शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये रात्री होणा-या अपघातांवर अकुंश ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून २१ मे ते ८ जुलै या सुमारे ४५ दिवसांत १ लाख ५८ हजार २६९ कारवाया केल्या असून, तब्बल १२ कोटी २१ लाख ९३ हजार ५५० रुपये एवढी दंडाची रक्कम वसुल करण्यात आली आहेयात ड्रंक अँड ड्राईव्ह करणा-या १२३२ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय जुलै च्या पहिल्या सप्तांहात ड्रंक अँड ड्राईव्ह, रॅश ड्रायव्हिंग, विनानंबर प्लेट, ट्रीपल सीट, रॉग साईड अशा एकूण ४५२२ जणांवरकारवाई करण्यात आली आहे.
शहरात कल्याणीनगर 'हिट अँड रन' प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या घटनेनंतर वाहतूक पोलिसांनी शहरातील विविध २० ठिकाणी नाकाबंदी करून हजारो वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली. तर, ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी गुन्हे दाखल करून त्यांच्यावर खटले भरण्यात आले. पोलिसांनी दि. ७ ते ८ जुलै या एका दिवसाच्या कालावधीत मोटार वाहन कायद्याअंतर्गत सर्व नियमांचे उललंघन करणा-या ७५४९ वाहनचालकांवर कारवाई करून ४९ लाख ७९ हजार ९५०रुपयांची दंडात्मक रक्कम वसूल केली आहे. याशिवाय दि. १ जानेवारी ते ३० जून दरम्यान १६८४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात असली तरी शहर परिसरात दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे आता दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारण्यास सुरुवात केली आहे. दारू पिऊन वाहन चालविताना आढळून आल्यास चालकाचे लायसन्स तीनमहिन्यांसाठी निलंबित केले जाणार आहे. या कारवाईनंतर संबंधित वाहन चालकाने पुन्हा तोच गुन्हा केल्यास लायसन्स परवाना कायमस्वरूपी निलंबित करण्याची देखील तरतूद आहे. यासाठी आरटीओ कार्यालयाची मदत घेतली जाणार असून, ही प्रक्रिया देखील करण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेचे उपायुक्त रोहिदास पवार यांनी सांगितले. त्यानुसार आता चौका-चौकात वाहतूक नियमनासाठी उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांना ड्रंक अँड ड्राईव्ह आढळून आल्यास थेट परवाना निलंबिनाची कारवाई होणार आहे.