बारामतीतील काटेवाडीत क्रिकेटचा खेळ रोखणाऱ्या पोलिसाला स्टंपने मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 07:37 PM2020-03-27T19:37:51+5:302020-03-27T19:52:50+5:30
ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गाव म्हणुन काटेवाडी गावाची ओळख
बारामती : जळोची पाठोपाठ बारामती तालुक्यातील काटेवाडी गावात देखील क्रिकेटचा खेळ रोखणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला स्टंपने मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शुक्रवारी(दि २७) सायंकाळी हि घटना घडली.नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांना तालुक्यात मारहाण केल्याच्या एकाच दिवशी दोन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
सध्या सर्वत्र संचारबंदी सुरु आहे. याच दरम्यान जळोची येथे क्वारंटाईन नागरीक आणि पोलिसांच्यामध्ये वाद झाला.या घटनेत पोलीस अधिकारी,पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे.त्यापाठोपाठ काटेवाडी गावात क्रिकेट खेळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यालाच मारहाण करण्यात आली आहे.
बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले, काटेवाडीमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या युवकांना पोलीस कर्मचारी पी. एस. कवीतके यांनी विचारणा केली.यावरुन कवितके यांना स्टंपने मारहाण करण्यात आली आहे.याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु असल्याचे घोलप यांनी सांगितले.
ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गाव म्हणुन काटेवाडी गावाची ओळख आहे.दोन्ही नेते कोरोनाशी लढा देण्यासाठी नागरिकांना आवाहन करीत आहेत,मदतीसाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत.मात्र, आज त्यांच्याच गावातील एका युवकाने पोलिसावर केलेल्या हल्याची सर्वत्र चर्चा सुरु होती.