पुणे : शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोत ब्रेक दाबल्यानंतर वीजनिर्मिती होईल. तीच वीज मग मेट्रो धावायलाही वापरण्यात येणार आहे. यातून ऊर्जाबचत होणार आहे. नव्याने केल्या जाणाऱ्या सर्व मेट्रोंमध्ये आता हेच तंत्रज्ञान प्रामुख्याने वापरण्यात येते.
शिवाजीनगर-हिंजवडी या २३ किलोमीटर अंतराच्या पुण्यातील दुसऱ्या मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. हिंजवडी आयटी हबमध्ये नोकरी करणाऱ्या काही लाख कर्मचाऱ्यांसाठी तसेच अन्य नागरिकांसाठी ही मोठीच सुविधा ठरणार आहे.
पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या माध्यमातून पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर हे काम होत आहे. त्यासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. मेट्रोच्या कामात सर्व प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. ब्रेक दाबल्यानंतर त्यातून वीजनिर्मिती हा त्याचाच एक भाग आहे. ‘रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम’ असे या यंत्रणेचे तांत्रिक नाव आहे.
रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम म्हणजे काय?
रिजनरेटिव्ह ब्रेकिंग ही एक ऊर्जा पुनर्प्राप्ती यंत्रणा आहे. मेट्रो ट्रेनच्या प्रक्रियेत जेव्हा ट्रेन ब्रेक लावते तेव्हा गतीज ऊर्जा सोडली जाते आणि ती मोटर्समधील विद्युत्प्रवाहात साठवली जाते. मेट्रो ट्रेनच्या बॅटरीजमध्ये वितरित होणारी अशी वीज इलेक्ट्रिक जनरेटर म्हणूनदेखील कार्य करते. ही एक ऊर्जा-बचत प्रक्रिया असते; कारण पुन्हा निर्माण केलेली विद्युतऊर्जा त्याच ट्रेनला किंवा मार्गावरील इतर मेट्रो गाड्यांना वापरता येऊ शकते. नेहमीच्या ऊर्जावापरात त्यामुळे लक्षणीय बचत होते.
अशी असेल ब्रेकिंग सिस्टम
शिवाजीनगर ते हिंजवडीदरम्यान धावणाऱ्या मेट्रोच्या प्रत्येक बोगीत इलेक्ट्रिक ब्रेकिंग तसेच इलेक्ट्रो-न्यूमॅटिक ब्रेकिंग अशा दोन यंत्रणा असणार आहेत. ट्रेनच्या मोटर्स ब्रेक कम पॉवर जनरेटर म्हणून काम करतील. नेहमीच्या वेगाने ट्रेनला इलेक्ट्रिक ब्रेकिंग लागू होईल; मात्र ट्रेनचा वेग ताशी १० कि.मी. किंवा त्याहून कमी होईल त्यावेळी इलेक्ट्रो-न्यूमॅटिक ब्रेकिंग सिस्टम सुरू होईल. मेट्रोच्या प्रत्येक बोगीत असे दोन स्वतंत्र इलेक्ट्रो-न्यूमॅटिक सर्किट्स असतील. एक सर्व्हिस सर्किट आणि एक सहायक सर्किट. मेट्रो बॉडीखाली बसवलेले इलेक्ट्रो-न्यूमॅटिक मॉड्यूल (EPM) एकाच वेळी काम करील. इलेक्ट्रो-न्यूमॅटिक मॉड्यूलमध्ये संपूर्ण वायवीय ब्रेक सक्रियकरण उपकरणे असतील, ज्यामध्ये वायवीय दाबनिर्मिती, दाबनियमन आणि इलेक्ट्रिक ब्रेक नियंत्रण यांचा समावेश असेल. या सर्व घटकांचे स्वतंत्र ब्रेक कंट्रोल युनिटद्वारे इलेक्ट्रो-न्युमॅटिकली नियंत्रण आणि निरीक्षण केले जाईल.
शिवाजीनगर हिंजवडी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशी तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे जगभरातील मेट्रोंमध्ये जे जे उत्तम ते या मेट्रोत आम्ही आणणार आहोत. ब्रेकमधून ऊर्जानिर्मिती करून त्या ऊर्जेचा पुन्हा वापर करणे हे संपूर्ण तंत्रज्ञान या मेट्रोत वापरले जाईल. याचा फार मोठा फायदा होणार असा विश्वास आहे.
- आलोक कपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड