इन्ट्रो
सन १९९२ पासून गावाच्या विकासासाठी जलसंधारणासह स्वच्छता, श्रमदान आणि पर्यावरण संतुलनासाठी काम करतोय. त्यातून गावाला शिस्त लागली. याचा फायदा कोरोनाच्या महामारीत गावात ४७ जण बाधित झाले असताना मोठा झाला. आजमितीस हिवरेबाजारमध्ये एकही कोरोना रुग्ण नाही. केवळ ‘चतु:सूत्री’ या उपक्रमातून संपूर्ण गाव कोरोनामुक्त केले. त्यामुळे ‘कृषी’ सप्ताहसह आता राज्यात हिवरे बाजारचा ‘कोविड’ सप्ताह राबवला जात आहे. ‘लोकमत’ने आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्याशी साधलेला हा संवाद -
-अभिजित कोळपे
कोरोनाची सुरुवात कशी झाली?
पवार - २० मार्चला गावात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर पुढील काही दिवसांत झपाट्याने आणखी काही जणांना कोरोनाची लागण झाल्याने आम्ही खडबडून जागे झालो. गावातील प्राथमिक शिक्षक, दूध डेअऱ्यांचे कामगार, विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव, कर्मचारी तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी या १७-१८ जणांचे पथक तयार केले. या पथकाने घरोघरी जाऊन प्रत्येक माणसाची तपासणी केली. त्यानंतर ५ एप्रिलच्या अहवालात ४७ गावकऱ्यांना कोरोना संसर्ग आढळून आला.
मग काय उपाय केले? चतु:सूत्री योजना काय?
पवार - १) कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पथक : गावात घरोघरी जाऊन कुटुंबातील प्रत्येक माणसाची (मॅन टू मॅन) तपासणी होते. २) क्वारंटाइन सेंटर : आढळलेल्या कोरोनाबाधिताला तत्काळ क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल केले जाते. ३) उपचार व सल्ला : बाधिताला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून योग्य सल्ला देणे व गरजेनुसार योग्य उपचार सुरु करणे. ४) ऑक्सिजन व तापमान तपासणी : सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तीन वेळात रुग्णाची नियमित तपासणी या पथकामार्फत करणे. या चतु:सूत्रीने आम्ही काम चालू केल्याने गाव कोरोनामुक्त झाले. आता १ ते २५ मे यादरम्यान एकही कोरोनाबाधित आढळला नाही.
अहमदनगर जिल्ह्यात उपक्रम राबविण्याचा निर्णय कोणी घेतला?
पवार : पहिला रुग्ण आढळल्यानंतर पुढील १५ दिवसांत आम्ही संपूर्ण गावाची तपासणी केली. यात ४-५ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली होती. त्यानंतर मात्र आम्ही सर्व ४७ कोरोनाबाधितांना १५ दिवसांत कोरोनामुक्त करण्याचा ध्यास घेऊन काम सुरू केले. त्याचा परिणाम आम्हाला टप्प्याटप्प्याने जाणवू लागला. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गावाची पाहणी केली. आम्ही राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती घेतली. त्यातून त्यांनी हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबवण्याचा निर्णय घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
पवार : पंतप्रधान नरेंद मोदी यांनी जेव्हा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना कोरोनाबाधित रुग्ण कसे बरे केले, असे विचारले. तेव्हा भोसले यांनी हिवरे बाजार येथील उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविल्याचे सांगितले. तेव्हा पंतप्रधानांनी हिवरेबाजारच्या उपक्रमाची माहिती विचारली. दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान कार्यालयातून या उपक्रमाची माहिती घेण्यासाठी फोन आला होता.
तुमचे मंत्री, खासदार, आमदार कोठे आहेत?
पवार : कोरोनाच्या संकटात मंत्री, खासदार किंवा आमदार गावोगावी जाऊ शकत नाही. ते राज्याचे धोरण ठरवू शकतात. त्यामुळे गावागावांत या संकटाचा सामना करण्यासाठी गावातील तरुणांनी जबाबदारी घेतली पाहिजे. आमच्या गावात आम्हाला याचाच फायदा झाला. आम्ही कोणाचीही वाट बघत बसलो नाही.
संकटात लोकांनी काय करायला हवे?
पवार : संकटात हेवे-दावे विसरून सर्वांनी एकमेकांना मदत करायला हवी. त्यासाठी आपलं गाव, तालुका, जिल्हा एक मानून काम करणे गरजेचे आहे. राजकारण सोडून समाजकारण केले तरच आपण या संकटातून बाहेर पडू.
कोरोनाचे रुग्ण वाढू नये, यासाठी काय खबरदारी घेता?
पवार : तिसरी लाट येणार हे गृहीत धरून सध्या आम्ही १८ वर्षांखालील मुलांचे तसेच गरोदर माता आणि ‘फ्रंटलाइन वर्कर’ यांच्या लसीकरणावर भर देत आहोत. गावातून बाहेर जाणाऱ्या आणि गावात येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करतो. त्यात कोणी बाधित आढळल्यास तातडीने क्वारंटाइन करून वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार करतो.
‘कृषी’ सप्ताहात ‘कोविड’ सप्ताह कसा राबवणार?
पवार : कृषी सप्ताहात शेतीची कशी काळजी घ्यायची, बदलत्या हवामानानुसार कोणती पिके घ्यायची, संकटात काय करायचे याचे मार्गदर्शन करतो. आता कोरोनाचे संकट आले असताना त्यातून वाचण्यासाठी काय करायला हवे, आपले घर, गाव, तालुका, जिल्हा यावर कसा मात करेल यासाठी गावात उपक्रम केले. या उपक्रमांची माहिती ‘कोविड’ सप्ताहात सांगणार आहोत. प्रत्येक गाव कोरोनामुक्त करण्यासाठी याचा फायदा होईल.