: २८ लाख ६६ हजार रुपये थकीत करवसुल
--
खोडद : वीजबिल न भरल्याने वीज वितरण कंपनीकडून हिवरे तर्फे नारायणगाव येथील ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजनेचे वीज कनेक्शन सोमवारी तोडले. यामुळे आज मंगळवारी सकाळी हिवरे गावात पाणी पुरवठा होऊ शकला नसल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागली.
हिवरे तर्फे नारायणगाव येथे पाणीपुरवठा योजना आहे.गावठाण वस्तीला रोज अडीच लाख लिटर पाणी पुरवठा केला जातो. गावठाण वस्तीवर ३३० कुटुंब आहेत. पाणी पुरवठा योजनेच्या बोअरवेलचे वीजबिल १ लाख २९ हजार तर विहिरीच्या पाणी पुरवठा वीज बिल ६० हजार रुपये थकीत वीज बिल होते. वीजबिल भरणेबाबत वीज वितरण कंपनीकडून ग्रामपंचायतला नोटीस बजावण्यात आली होती. सोमवारी विहीर व बोअरवेलचे वीज कनेक्शन तोडण्यात आले.
सरपंच सोमेश्वर सोनवणे व उपसरपंच दिगंबर भीर म्हणाले की, हिवरे गावची ३१ मार्च २०२० पर्यंत २८ लाख ६६ हजार ३८६ रुपये करवसुली थकीत आहे. आतापर्यंत केवळ २० टक्के कर वसूल झाला आहे. नागरिकांची मागील अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत कर न भरल्याने थकीत बाकी वाढली आहे. ग्रामपंचायतकडे रोख रक्कम शिल्लक नसल्याने वीज बिल भरता आले नाही. सध्या ग्रामपंचायतकडे कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध नाही. कर वसूल मोठ्या प्रमाणात थकीत आहे.नागरिकांनी आपली जबाबदारी समजून घरपट्टी जमा करावी.
मंगळवारी सरपंच सोमेश्वर सोनवणे , ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांनी गावठाण वस्तीवर ९४ हजार ८९७ रुपये करवसुली केली आहे. मंगळवारी सायंकाळी खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा जोडण्यात आला.