हिवरे खुर्द येथे एकूण ५० हेक्टर वनक्षेत्र आहे. त्यातील १५ हेक्टर वनक्षेत्रात वनखात्याने वृक्षारोपण केले आहे. वृक्षारोपण केलेली झाडं जगविण्यासाठी वनखात्याने टँकरने पाणी घालून ही झाडं जगवली होती. वृक्षारोपण केलेली झाडे दोन वर्षांची झाली होती. यात वड, पिंपळ, चिंच, कडुलिंब, शिवण, आवळा, कांचन, वसूल, करंज अशी झाडे लावण्यात आली आहेत.
या क्षेत्रात वणवा लागू नये म्हणून वनखात्याने ठिकठिकाणी जाळपट्टे काढले आहेत. जाळपट्टे काढल्यामुळे वणवा जरी लागला तरी तो मोठ्या स्वरूपात वाढत नाही. जाळपट्ट्यांमुळे वणवा आपोआप नियंत्रणात येतो. मात्र आग लावणाऱ्या व्यक्तींनी जाळपट्टे सोडून ३ ते ४ वेगवेगळ्या ठिकाणी आग लावली. यामुळे ही आग वाढतच गेली.
बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर हिवरे येथील एका शेतकऱ्याने वनपरिमंडल अधिकारी मनीषा काळे यांना तत्काळ संपर्क साधून याबाबत माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच मनीषा काळे यांनी वणवा नियंत्रण टीमसोबत घटनास्थळी धाव घेतली.
वनपरिमंडल अधिकारी मनीषा काळे, वनरक्षक कल्याणी पोटवडे यांच्यासह तेजेवाडीमधील स्थानिक तरुण राजेश नायकोडी, संजय जाधव, अनिल परदेशी, ओंकार नायकोडी, अक्षय नायकोडी, प्रकाश नायकोडी, विशाल नायकोडी, अनिल जाधव यांच्यासह १५ जणांनी आग विझविण्यासाठी मदत केली. या आगीत झाडांचं अधिक नुकसान होऊ नये म्हणून वनखात्याकडून गुरुवारी सकाळी सर्व झाडांना टँकरने पाणी घालण्यात आले.
जुन्नरचे उपवनसंरक्षक जयरामे गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली ३ वणवा नियंत्रण टीम तयार करण्यात आल्या आहेत. त्यापैकी जुन्नरच्या टीमने सहभाग घेतला. अज्ञात व्यक्तींकडून या क्षेत्रात आग लावण्याची ही दुसरी वेळ आहे. वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे.
चौकट
हिवरे खुर्द येथील वनक्षेत्रात मुद्दाम आग लावली आहे. वणवा लागल्याने निसर्गाची हानी होते. प्राणी, पक्षी, त्यांची पिल्ले, त्यांची अंडी वणव्याच्या आगीत जाळून नष्ट झाल्याने जैवविविधतेची एक पिढीच नष्ट होते. झाडांच्या खाली पडलेल्या बियादेखील आगीत जळून जातात व त्या बियांपासून पावसाळ्यात नैसर्गिकरीत्या उगवणारी होणारी रोपं उगवत नाहीत. आपल्या जवळपासच्या वनक्षेत्रात आग लागल्यास स्थानिक नागरिकांनी तत्काळ वनखात्याच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा तसेच आग विझविण्यासाठी मदत करावी.
- मनीषा काळे, वनपरिमंडल अधिकारी,
नारायणगाव
- हिवरे खुर्द येथील वनक्षेत्रात लावलेल्या आगीत होरपळलेल्या झाडांना टँकरने पाणी घालून ही झाडे जगविण्याचा प्रयत्न सुरू आहे.