पुणे : जुना बाजार परिसरातील शाहीर अमर शेख चौकातील होर्डिंग दुर्घटनेची चौकशी मध्य रेल्वेच्या समितीने पूर्ण केली आहे. आता या समितीकडून प्रशासनाला नेमका काय अहवाल सादर केला जाणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. पुढील आठ दिवसांत हा अहवाल मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांना सादर केला जाईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.होर्डिंग दुर्घटनेला बुधवारी (दि. ५) दोन महिने पूर्ण झाले. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने वरिष्ठ अधिकाºयांची चौकशी समिती नियुक्त करून चौकशी सुरू केली. मागील आठवड्यात या घटनेला दोन महिने पूर्ण झाले. पण या घटनेची चौकशी आतापर्यंत पूर्ण झाली नव्हती. रेल्वेचा एक अधिकारी व कर्मचाºयाला पोलिसांनी अटक केली होती. ते काही दिवस कोठडीत होते. त्यामुळे दरम्यानच्या काळात त्यांची चौकशी करता आली नाही, असा दावा रेल्वे अधिकारी करत होते. दोघेही काही दिवसांपूर्वीच जामिनावर कोठडीतून बाहेर आले. त्यानंतर मागील आठवड्यात चौकशी समितीतील वरिष्ठ अधिकारी मुंबईतून पुण्यात आले.समितीने दोन-तीन दिवस दोघांचीही कसून चौकशी केली. ही चौकशी शुक्रवारी पूर्ण झाली आहे. आता समितीकडून चौकशीचा सविस्तर अहवाल तयार केला जाईल. त्यानंतर हा अहवाल मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे सादर केला जाईल. त्यानंतर दुर्घटनेची माहिती तसेच दोषींबाबत माहिती दिली जाईल. पुढील आठवड्यामध्ये अहवालाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर चित्र स्पष्ट होईल, असे रेल्वेतील अधिकाºयांनी सांगितले. दरम्यान, समितीमध्ये मध्य रेल्वेचे उपमुख्य अभियंता ए. के. सिंग, उपमुख्य सुरक्षा अधिकारी शिवकुमार, उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक के. व्ही. थॉमस तसेच पुणे विभागातील वरिष्ठ सुरक्षा अधिकारी डी. विकास यांचा समावेश आहे.
होर्डिंग दुर्घटना: चौकशी पूर्ण; अहवालाची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 2:21 AM