लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव : बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नसेल तर काळजी करू नका. नारायणगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील एजंटांना हाताशी धरा आणि तीस ते चाळीस हजार रुपये मोजा आणि थेट दस्त नोंदणी करा. दुय्यम निबंधक कार्यालयात मध्यस्थीच्या मदतीने खुलेआम बेकायदेशीर व्यवहारांचे दस्त नोंदणी सुरु असून ग्राहकांची मोठी लुट सुरु आहे. मात्र, या प्रकाराकडे प्रशासनाने मात्र डाेळेझाक केली आहे.
जुन्नर तालुक्यात नारायणगाव आणि जुन्नर ही दोन दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. नारायणगाव कार्यालया अंतर्गत आळेफाटा, बेल्हे, पिंपळवंडी, नारायणगाव, खोडद, मांजरवाडी, या गावांसह ६५ गावे येतात. यातील बहुतांश गावे सधन म्हणून ओळखली जातात. कोरोनाच्या कालावधीत खरेदी-विक्री व्यवहार ठप्प होते. कार्यालयेही बंद होती. मे २०२० पासून खरेदी-विक्री व्यवहार सुरू झाल्यानंतर कार्यालयात मोठी गर्दी सुरु आहे.
ग्रामीण भागात अनेक बांधकामे टाऊन प्लानिंगच्या मंजुरी नुसार आहेत. परंतु मंजूर कामापेक्षा वाढीव व नियमबाह्य बांधकाम बिल्डरने केल्याने बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतलेला नाही. त्याचा फायदा घेऊन सदनिका विक्रीसाठी आलेल्या ग्राहकास बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नसल्याचे कारण देत दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करण्यास नकार दिला जातो. मात्र बाहेरील एजंट, दस्त नोंदणी करणारे दस्त लेखनिकद्वारे तडजोड करून तीस ते चाळीस हजार रुपये मोबदला देण्यास तयार झाल्यास लगेचच दस्त नोंदणी केली जात आहे. त्याच बरोबर बेकायदेशीर बांधकामांची देखील दस्त मोठी रक्कम घेऊन केली जात आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयातील मनमानी कारभाराची तक्रार अनेक ग्राहकांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नोंदणी महानिरीक्षक यांच्यासह खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके यांच्या कडे केली आहे.