लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सोलापूर वगळता अन्य सर्व जिल्ह्यांमधील साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देत आहेत. परंतु सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने शेतकऱ्यांना एफआरपीपासून वंचित ठेवत असल्याचा आरोप करत शिवसेनेने सोमवारी (दि. १४) साखर संकुलासमोर धरणे धरले. यावेळी आंदोलकांनी संकुलाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी केली.
सोलापूर जिल्हा शिवसेनेचे युवा नेते नागेश वनकळसे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात मोहोळ तालुका शिवसेना प्रमुख अशोक भोसले, विद्यार्थी सेनेचे हर्षल देशमुख, बाळासाहेब वाघमोडे, नाना भोसले, गणेश लखदिवे सहभागी झाले होते. प्रवेशद्वारावरील या आंदोलनाची दखल घेत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी त्यांना चर्चेस बोलावले.
“रंगराजन समितीच्या अहवालानुसार कारखान्याच्या महसुली उत्पन्नापैकी ७० टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांची थकीत एफआरपी त्वरीत शेतकऱ्यांना अदा करण्याचे आदेश द्यावेत, कारखान्याला ऊस गेल्यापासून १४ दिवसात एफआरपीची रकम शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करावी, कारखान्याच्या रिकव्हरी तपासणीसाठी शासकीय प्रतिनिधी नेमावेत, कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन करावेत,” आदी मागण्या साखर आयुक्तांकडे करण्यात आल्या.
चौकट
“सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने थकीत एफआरपीसाठीचे निवेदन दिले आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील बहुसंख्य कारखान्यांप्रमाणेच ‘एफआरपी’नुसार पहिली उचल द्यावी, अशी सोलापूरच्या ऊस उत्पादकांची मागणी आहे. त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे.”
- शेखर गायकवाड, साखर आयुक्त