पुणे : होळीच्या निमित्ताने काँग्रेस भवनमध्ये रविवारी केंद्र सरकारने नव्याने लागू केलेल्या शेतकरी व कामगार कायद्याची होळी करण्यात आली. शेतकरी बचाव संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी यात सहभागी होते.
कोरोना साथीचे सरकारी नियम पाळून ही होळी करण्यात आली. माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते होळी प्रज्वलित केली. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, अभय छाजेड, कमल व्यवहारे, नीता परदेशी, लोकायत संस्थेचे नीरज जैन, तसेच शेतकरी बचाव कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. जनतेची दिशाभूल करत धन दांडग्यांच्या कंपन्यांच्या नफ्यासाठी बीएसएनएल, रेल्वे, एलआयसी, एअरपोर्ट विकण्याचा केंद्र सरकारने सपाटा लावला आहे. याबरोबरच जीएसटी, नोटाबंदी यामुळे सामान्यांचे कंबरडे मोडलेच आणि इंधन दरवाढीने सामान्यांचे जगणे कठीण केले आहे. कामगारांना गुलाम करणारे कायदे आणले आणि शेतकऱ्यांपासून सामान्यांपर्यंत सर्वांना देशोधडीला लावणारे कृषी कायदेही आणले. हे सरकार गेल्याशिवाय सामान्यांचे जगणे सुखाचे होणार नाही अशी टीका केली.