पुणे : होळीच्या सणासाठी प्रदोष काल महत्त्वाचा असल्याने सोमवारी (दि.६ ) हुताशिनी पौर्णिमेला होलिका दहन करावे, असे दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले. तर, सोमवारी भद्रेवर पौर्णिमा येत असल्याने भद्रेचा कालावधी संपल्यानंतर मंगळवारी (दि.७ ) नागरिकांनी होलिका दहन करावे असे पुण्यातील पंचांगकर्ते व खगोलशास्त्राचे अभ्यासक गौरव देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे. होलिका दहन करण्याबाबत पंचांगकर्त्यांच्या सांगण्यात एकवाक्यता नसल्याने नक्की होलिका दहन कधी करायचे? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
पंचांगांमध्ये सोमवारी (दि.६ ) होळीच्या सणाचा उल्लेख करण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना मोहन दाते म्हणाले, या वर्षी सोमवारी (दि. ६ ) दुपारी ४ वाजून १८ मिनिटांनी चतुर्दशी समाप्ती होत असून त्यानंतर पौर्णिमा सुरू होत आहे. पौर्णिमेसाठी प्रदोष काळ महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, दिल्ली येथे सोमवारी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनंतर सूर्यास्त होत असल्याने या राज्यांमध्ये सोमवारीच होलिका दहन करावे. तर, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसा, आसाम, मेघालय या राज्यांमध्ये पौर्णिमा समाप्तीपूर्वी म्हणजे मंगळवारी ( दि. ७ ) होलिका दहन करावे.
मात्र, गौरव देशपांडे यांनी होलिका दहन योग्य दिवशी व्हावे यासाठी नागरिकांनी सोमवारी (दि. ६ ) नव्हे तर, मंगळवारी (दि. ७ ) होलिका दहन करावे असे आवाहन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सोमवारी (दि. ६ ) तिथीचा अर्धा भाग असलेला करण आणि त्याचा एक भाग असलेला भद्रा येत आहे. भद्रा ही दर महिन्याच्या पौर्णिमेला येते. मात्र, पुराणात रक्षाबंधन आणि होलिका दहन या दोन पौर्णिमा भद्रेवर साज-या करू नयेत, असे सांगण्यात आले आहे. हे लक्षात घेत भद्रेचा कालावधी संपल्यानंतर नागरिकांनी मंगळवारी (दि.७) होलिका दहन करावे. होलिका दहन करताना पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा. यासाठी पेट्रोलचा वापर न करता तिळाचे तेल आणि गाईच्या दुधापासून बनविलेले तूप यांचा वापर करीत अग्नी प्रज्वलित करावा असेही सांगितले.