पुणे : राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत निर्णय झाला असला तरी महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात कोणतीही घोषणा अद्याप उच्च शिक्षण विभागाने केली नाही.त्यामुळे राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून येत्या २० जानेवारीपूर्वी जाहीर केला जाईल, अशी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पोकळ घोषणा केली होती का? अशी चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात आहे.
कोरोनानंतर बंद असलेले राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग येत्या २७ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने केला आहे. मात्र, पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासह व्यावसायिक अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाग उदासिन असल्याचे दिसत आहे. तसेच कोरोनाबाबत आवश्यक खबरदारी घेवून महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात पुढाकार घेणाऱ्या विद्यापीठांना रोखले जात आहे. त्यामुळे महाविद्यालये सुरू करण्याची उच्च शिक्षण विभागाची इच्छा नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.
राज्य शासनाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला महाविद्यालय सुरू करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर खुलासा मागवला होता. मात्र, विद्यापीठाच्या अधिसभेत त्याचे चांगलेच पडसाद उमटले होते. काही अधिसभा सदस्यांनी याबाबत निषेध नोंदवला होता. त्याचच ऑनलाईन शिक्षणाचा कंटाळा आला असून प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू करावीत, अशी मागणी विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. तसेच सध्या विद्यार्थी महाविद्यालयात येत नाहीत.परिणामी शैक्षणिक संस्थांकडे शुल्क जमा होत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे तात्काळ महाविद्यालये सुरू व्हावीत,अशी मागणी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. सर्वच क्षेत्रातून महाविद्यालय सुरू करण्याची मागणी होत असताना उच्च शिक्षण विभाग हातावर हात ठेऊन बसल्याने सर्वांकडूनच नाराजी व्यक्त केली जात आहे.