मंचर : श्रावणी बैलपोळा आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. बैलांची वाजत गाजत मिरवणुक काढून सायंकाळी त्यांना पुरणपोळीचा घास भरविण्यात आला. महाळुंगे पडवळ येथे बैलपोळा यात्रा उत्सवानिमित्त बैलांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.सध्या शेतकरी यांत्रिक पद्धतीने शेती करतात. ट्रॅक्टर व इतर यांत्रिक अवजारांच्या वापरामुळे बैलाचे महत्त्व काहीसे कमी झाले आहे. ठराविक शेतकऱ्यांकडे शेतीच्या मशागतीसाठी बैल शिल्लक असून अशा शेतकºयांनी मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा केला. बैलांना सकाळी नदी, ओढे नाल्यांवर नेवून स्वच्छ अंघोळ घालण्यात आली. दुपारपासून बैलांना सजविण्याची लगबग सुरू होती. बैलांच्या शिंंगांना सोनेरी लावून त्यांना झुली चढवून सजविण्यात आले. त्यानंतर सायंकाळी बैलांच्या वाजत गाजत मिरवणुका काढण्यात आल्या. पारंपारिक वाद्य मिरवणुकीच्या आग्रभागी होते. शेतकºयांनी बैलांपुढे नाचून आनंद साजरा केला. सायंकाळी घरी पुरणपोळीचा गोड घास बैलांना भरविण्यात आला.दरम्यान, ज्यांच्या घरी बैल नाही त्यांनी मातीच्या बैलांची पुजा केली. मंचरसह इतर गावांमध्ये मातीचे बैल मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. रंगबिरंगी मातीच्या बैलजोडीला चांगली मागणी होती. मोठी बैलजोडी २०० ते २५० रुपये मध्यम बैलजोडी १०० ते १५० तर छोटे मातीचे बैल ७० ते १०० रुपयांना विकले जात होते. या मातीच्या बैलांची घरी नेवून पूजा करण्यात आली. महाळुंगे पडवळ येथे बैलपोळा यात्रा उत्सवाला सुरुवात झाली. बैलांची मिरवणूक काढण्यात आली.वडगाव काशिंंबेग येथे पारंपारिक पद्धतीने बैलपोळा सण साजरा करण्यात आला. आंब्याच्या पानाची तोरणे घराला बांधण्याची येथे परंपरा असून बैलपोळ्यानिमित्त सर्वच घरांना सकाळी ही तोरणे बांधण्यात आली. सायंकाळी बैलांची आकर्षक मिरवणुक काढण्यात आली.
बळीराजाकडून बैलपोळा उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 1:54 AM