पुरंदर तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे काही गावे कोरोनाची हॉटस्पॉट झाली आहेत. एकाच कुटुंबात लक्षणेविरहीत रुग्ण आढळून आले. त्या रुग्णांना होम आयसोलेशन हा पर्याय दिला होता. या रुग्णांनी घरीच असणे अपेक्षित असते. मात्रे असे रुग्ण घरी न थांबता गावभर भटकत असतात. काही लोक शेतीची कामे व आपले व्यावसाय करत बसतात हे धोकेदायक आहे. त्यांच्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यत आहे. त्यामुळे पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी नुकतेच सक्त आदेश दिला होता की जर रुग्ण घरी आढळून नाही आला तर त्यावर कारवाई करण्यात येईल.
त्या अनुषंगाने गेली दोन दिवस नीरा पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर, सुदर्शन होळकर, सुरेश गायकवाड, हवालदार राजेंद्र भापकर, संदीप मोकाशी, नीलेश जाधव यांनी जेजूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या नीरा, वाल्हे, पिंपरे (खुर्द), मांडकी, पिसुर्डी या हॉटस्पॉट गावातील आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्यांसह पोलीस पाटील यांनसोबत होम आयसोलेशनमध्ये असलेल्या लोकांच्या घरी भेट देत रुग्ण घरीच आहेत का, याची खात्री करत या रुग्णांचे समुपदेशन करत आहेत.
मांडकी येथे होम आयसोलेशनमधील रुग्णांना सूचना देताना सहायक पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर.