नीरा: दोन दिवसांपूर्वी येथील एका कोरोना रुग्णाचा घरीच मृत्यू झाला होता. यानंतर आता आरोग्य प्रशासन कामाला लागले असून यापुढे कोणत्याही रुग्णाला होम आयसोलेशनचा पर्याय न देण्याच्या सूचना तालुका आरोग्य अधिकरी डॉ. उज्वला जाधव यांनी दिल्या आहेत. त्याच बरोबर नीरा आणि परिसरातील गावातून होम टू होम सर्वेक्षण करून लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुरंदरच्या आरोग्य अधिकारी डॉ.उज्वला जाधव यांनी नीरा शहरात वाढत्या कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे रविवारी तातडीची बैठक घेतली. यावेळी नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आदित्य धारूरकर, तालुका आरोग्य पर्येवेक्षक भास्कर कारकुड, आरोग्य सहाय्यक गणेश जाधव, आरोग्य सेवक शिवाजी चव्हाण, नीरा ग्रामपंचायतीचे प्रशासक नामदेव गायकवाड, ग्रामविकास अधिकारी मनोज ढेरे, पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अनिल चव्हाण उपस्थित होते.
डॉ.जाधव म्हणाल्या की, नीरा येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. रुग्णाला कोरेाना सेंटरमध्ये ठेवण्यास सांगितले असतानादेखील त्यांना घरी नेहण्यात आले. मात्र आता कोणालाही घरी उपचार घेण्यास परवानगी दिली जाणार नाही. तालुक्यातील सर्वच कोवीड केअर सेंटर मध्ये बेड उपलब्ध आहेत. आणि त्यामूळे लोकांनी तिथेच उपचार घ्यावेत.
नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सहा टिमच्या माध्यमातून घरो घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये ज्या रुग्णांचे शरीराचे तापमान जास्त आहे, ऑक्सीजन लेव्हल कमी आहे, किंवा कोरोनाची लक्षणे अढळून येत आहेत अशा लोकांची नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रातच ॲन्टीजन टेस्ट करण्यात येत आहे. सुपर स्प्रेडमधील लोकांची ही तपासणी करण्यात येणार आहे. त्याच बरोबर ज्या कुटुंबातील सदस्य पाँझिटिव्ह येईल त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी १४ दिवस होमक्वॉरंटाइन रहावे.
हे सर्वेक्षण पिंपरे (खुर्द), गुळूंचे, कर्नलवाडी, मांडकी या गावातून सुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.जाधव यांनी दिली. त्याच बरोबर ज्या भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त असेल तेथे सुक्ष्म कंटेनमेंट झोन तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट
नीरा हे जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या सीमेवर आहे. त्यामुळे सातारा खंडाळा, लोणंद तसेच बारामती येथील शासकीय किंवा खासगी लॅबमध्ये काहीजण कोरोना चाचणी करुन घेत आहेत. त्या लॅबचे अहवाल पुरंदरच्य आरोग्य विभागाकडे येण्यात वेळ जात होता. तोपर्यंत पाँझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करण्यात अडचणी येत होत्या. मात्र, आता तालुक्यातील रुग्णांचे अहवाल ज्या त्या दिवशी देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
डॉ. उज्वला जाधव.
तालुका वैद्यकीय अधिकारी
फोटोओळ :- नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात वाढत्या कोरोना रुग्णसंखे बाबत तालुका वैद्यकीय अधिकारी ग्रामपंचायत प्रशासक व पोलिसांनी बैठक घेतली.