पुणे : राज्यातील कारागृहे हे स्वातंत्र्य पूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहेत. या ऐतिहासिक घटनांमधून प्रेरणा मिळावी, यासाठी कारागृहांमध्ये प्रिझन टुरिझम ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात पुण्यातील येरवडा कारागृहापासून जेल पर्यटन प्रकल्पाने होणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली.
येत्या २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईनद्वारे या प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहे. यावेळी येरवडा कारागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असून आपण ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याचे असे देशमुख यांनी सांगितले.कारागृह महानिरीक्षक सुनिल रामानंद हा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला होता. त्याचे सर्वप्रथम वृत्त ‘लोकमत’ ने दिले होते.
येरवडा, ठाणे, नाशिक कारागृहात स्वांतत्र्य लढ्यात अनेक घटना, प्रसंग घडले आहेत. राष्ट्रीय पुढार्यांनी या कारागृहामध्ये शिक्षा भोगली आहे. हा प्रेरणादायी इतिहास समजून घेण्यासाठी कारागृह पर्यटन उपयुक्त ठरणार आहे. महात्मा गांधी व डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील ऐतिहासिक पुणे करार, पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात जेथे झाला. त्याला गांधी यार्ड असे नाव देण्यात आले असून तत्कालीन संदर्भही जतन करण्यात आले आहे. लोकमान्य टिळकांची कोठडी येथे आहे. बॅरिस्टर मोतीलाल नेहरु, पंडित जवाहरलाल नेहरु, सरोजिनी नायडु, वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस येरवडा कारागृहात होते. सरसंघचालक बाळासाहेब देसरस यार्डही येथे आहे. बाळासाहेब ठाकरे हे या तुरुंगात होते. यांचे सर्व संदर्भ पर्यटकांना येरवडा भेटीत पहायला मिळू शकणार आहेत.