पुणे : एखाद्याला कोणतीही सेवा दिल्यास त्याचा फीडबॅक जाणून घेण्यासाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून कॉल केला जातो, याचा अनुभव अनेकांना असेल. पण पोलीस जनतेशी कशा प्रकारे वागतात. त्यांना उत्तम सेवा देतात का? हे जाणून घेण्यासाठी गृहमंत्र्यानी एका व्यक्तीला फोन लावला. त्याच्याकडूनच पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या वागणुकीचा अनुभव कसा होता, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीने पोलिसांचे काम उत्तम असल्याची पावती दिली.
पण तो निघाला राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता. तुमचे पद सांगितल्यामुळे तुम्हाला पोलिसांकडून चांगली वागणूक दिली का? अशी मिश्किल टिप्पणी गृहमंत्र्यांनी केली.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुणे पोलिसांचे काम जाणून घेण्यासाठी काही विभागांना भेटी दिल्या. त्यांच्या समवेत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते. सेवाप्रणाली कार्यालयातील समन्वय कर्मचारी पूजा भगत यांनी एका अर्जदाराला फोन केला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आपल्याशी बोलणार असल्याची माहिती त्यांनी अर्जदाराला दिली.
एखाद्या व्यक्तीने पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधल्यानंतर त्यांना योग्य ती सेवा आणि मदत दिली जाते का? ते समाधानी आहेत का? याची तपासणी करण्यासाठी वळसे पाटील यांनी एका व्यक्तीला फोन लावला. रमेश राऊत असे त्यांचे नाव होते. पोलीस व्हेरिफिकेशसाठी मुंढवा पोलीस स्टेशनला गेलो होतो. पोलिसांनी खूप चांगली सेवा दिली असल्याचे त्यांनी सांगताच तुमचे पद बघून चांगली वागणूक दिली का? अशी विचारणा करताच कार्यकर्ता हसला.
पुण्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती कशी आहे, हे जाणून घेण्याबरोबरच त्याविषयी चर्चा करण्यासाठी आज पोलीस आयुक्तालयात आलो आहे. पोलीस जनतेला कशा प्रकारे वागणूक देतात हे जाणून घेण्यासाठी एका व्यक्तीला कक्षातून फोन लावला आणि त्यांनी पोलिसांकडून चांगली वागणूक मिळाली असल्याचे सांगितले.
....