पिंपरी : विनामास्क वाहनचालकांवर कारवाई करताना एका वाहनचालकाने वाहतूक पोलिसाच्या अंगावर गाडी घातली. तसेच गाडीच्या बोनेटवरून फिरवले. जिवाला धोका असतानाही वाहतूक पोलिसाने धाडस दाखवून कर्तव्य पार पाडले. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सत्कार करून या पोलिसाचे काैतुक केले.
आबासाहेब विजयकुमार सावंत, असे या धाडसी पाेलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. सावंत हे चिंचवड वाहतूक विभागात कार्यरत आहेत. चिंचवड येथील अहिंसा चाैक येथे सावंत वाहतूक नियमन करून विनामास्क वाहनचालकांवर कारवाई करीत होते. त्यावेळी युवराज हनुवते हा चारचाकी वाहनचालक मास्कचा वापर न करता वाहन चालवित असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलीस कर्मचारी सावंत यांनी वाहन थांबविण्यास सांगितले. मात्र हनुवते याने वाहन न थांबविता सावंत यांच्या अंगावर चारचाकी गाडी घातली. त्यावेळी सावंत यांनी प्रसंगावधान राखत चारचाकीच्या बोनेटवर झेप घेतली. त्यानंतरही वाहनचालक हनुवते याने गाडी न थांबविता सावंत यांना बोनेटवरून ८०० मीटर घेऊन गेला. या वेळी सावंत यांनी धाडसाने स्वत:चा बचाव केला. त्यानंतर वाहनचालक हनुवते याच्यावर पोलिसांनी कारवाई केली.
पोलीस कर्मचारी सावंत यांच्या या धाडसाची व कर्तव्यदक्षतेची दखल घेत गृहमंत्री देशमुख यांनी मुंबई येथे सोमवारी त्यांचा सत्कार केला. तसेच त्यांच्या प्रसंगावधानतेबाबत काैतुक केले. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश तसेच वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले आदी यावेळी उपस्थित होते. सावंत यांनी कर्तव्याप्रति निष्ठा राखल्याने त्यांना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी १० हजारांचे रोख बक्षिस तसेच प्रशंसापत्र प्रदान केले.