बऱ्हाणपूरच्या पोलिस उपमुख्यालयाला गृहमंत्रालयाची मंजुरी;वाढत्या गुन्हेगारीवर वचक बसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 03:48 PM2020-08-28T15:48:54+5:302020-08-28T15:49:52+5:30

५० एकरात उभारणार पोलिस उपमुख्यालय

Home Ministry approves Barhanpur police sub-headquarters | बऱ्हाणपूरच्या पोलिस उपमुख्यालयाला गृहमंत्रालयाची मंजुरी;वाढत्या गुन्हेगारीवर वचक बसणार

बऱ्हाणपूरच्या पोलिस उपमुख्यालयाला गृहमंत्रालयाची मंजुरी;वाढत्या गुन्हेगारीवर वचक बसणार

googlenewsNext
ठळक मुद्देपुणे जिल्ह्यातील आठ उपविभाग व त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या २८ पोलीस ठाण्याचा समावेश 

बारामती : बऱ्हाणपूर (ता. बारामती) येथे प्रस्तावित असणाऱ्या पोलिस उपमुख्यालयाला राज्याच्या गृहमंत्रालयाने शुक्रवारी (दि. २८) मंजुरी दिली आहे. ५० एकरावर हे उपमुख्यालय उभारण्यात येणार आहे. या उपमुख्यालयाच्या निमित्ताने बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. अप्पर पोलीस अधिक्षकांच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस मुख्यालयातून बारामती येथील पोलिस बंदोबस्त येईपर्यंत तेथील परिस्थिती आटोक्यात आणणे अत्यंत अडचणीचे होत असते. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण राखणे व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून बऱ्हाणपूर येथे पोलीस उपमुख्यालय कार्यरत होणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील आठ उपविभाग व त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या २८ पोलीस ठाण्याचा समावेश  असणार आहे.  

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र, मुख्यालयापासूनचे अंतर, पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये लोकसंख्येमध्ये व गुन्ह्याच्या संख्येमध्ये झालेली लक्षणीय वाढ, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस मुख्यालयातून बारामती येथील पोलीस बंदोबस्त येईपर्यंत तीन ते साडेतीन तासांचा कालावधी जातो. त्यामुळे स्थानिक पोलिसांना अपुरे मनुष्यबळाअभावी तेथील परिस्थिती आटोक्यात आणणे अत्यंत अडचणीचे होते. जिल्ह्याच्या आस्थापनेवर एकच पोलीस मुख्यालय कार्यरत आहे. त्यामुळे बऱ्हाणपुर येथे पोलीस उपमुख्यालय स्थापन करणेबाबतचा प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाने सादर केला होता. 
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने बऱ्हाणपूर येथे पोलीस उपमुख्यालय निर्माण करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात येत आहे. पोलीस उपमुख्यालयाकरिता आवश्यकपद निर्मितीबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाकरिता प्रशासकीय इमारत व इतर अनुषंगिक अनावर्ती खर्च हा सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन वार्षिक योजनेमधुन भागविण्यात येणार आहे.

 सध्या कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावणारे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे अप्पर पोलीस अधीक्षक बारामती ही दोन कार्यालय आहेत. पुणे जिल्ह्यातील अप्पर पोलिस अधीक्षक बारामती यांचे कार्यक्षेत्रात बारामती,हवेली, भोर, दौंड या चार उपविभागांचा समावेश आहे. तर अप्पर पोलीस अधीक्षक पुणे यांचे कार्यक्षेत्रात लोणावळा, देहुरोड, खेड, जुन्नर या चार उपविभागांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अप्पर पोलिस अधीक्षक बारामती यांचे कार्यक्षेत्रात मोठमोठ्या शैक्षणिक संस्था, उजनी, वीर,भाटघर ही महत्वाची धरणे आहेत. सोमेश्वर, जेजुरी, मोरगाव, थेऊर, रांजणगावही प्रमुख तीर्थक्षेत्र असून जिल्ह्यातील अति महत्त्वाची ठिकाणे आहेत.बारामती येथे विमानतळ, दौंड येथील रेल्वे जंक्शन, लोणी काळभोरला पेट्रोलियम पदार्थांचा साठा आहे. प्रशासकीय नियंत्रण या दृष्टिकोनातून पुरेसा बंदोबस्त सारखा पुरवावा लागतो असतो. त्यामुळे कायदासुव्यव्स्थेंचा प्रश्न मार्गी लावण्याच्या उद्देशाने पुणे उपमुख्यालयाचीउभारणी करण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे.

जिल्हा उपमुख्यालयात यांचा समावेश
    ट्रेनिग सेंटर
    प्रशासकीय भवन
    विभाग निहाय कर्मचारी निवास्थाने
    पोलीस हॉस्पिटल
    मोटार परिवहन विभाग
     शॉपिंग सेंटर
     बहूद्देशीय हॉल
     परेड मैदान
     गोळीबार मैदान
     पोलीस अधिकारी व कर्मचारी विश्रांतीगृह
     स्विमिंग पूल


प्राथमिक कामकाजासाठी २ कोटी मंजूर
बारामती तालुक्यात बऱ्हाणपूर येथे ५० एकर क्षेत्रांवर जिल्हा उपमुख्यालय उभारण्यात येणार आहे. प्राथमिक बाब म्हणून संरक्षण भिंत व प्रवेशद्वार उभारण्यासाठी लागणाऱ्या २ कोटी खर्चास मजुरी यापूर्वी देण्यात आली होती.

.....................

पुणे जिल्ह्याच्या दक्षीण भागात कायदा सुव्यवस्था व प्रशासकीय नियंत्रण या दृष्टिकोनातून पुरेसा बंदोबस्त सारखा पुरवावा लागतो असतो. याठिकणी उपमुख्यालय झाल्यास वेळेत बंदोबस्त पुरवणे सोयीचे होणार आहे. तसेच कायदा सुव्यवस्था राखणे सोपे जामार आहे.
- नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती.
----------------------------------

Web Title: Home Ministry approves Barhanpur police sub-headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.