पुणे : वेताळ टेकडीवर मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी पहायला मिळतो. हे मोर माझ्या घरासमोरील टाकीवर दर्शन देतात. आजच २ मोर आणि ६-७ लांडोर पहायला मिळाले. त्यामुळे टेकडी हा यांच्यासाठी घर असून, वेताळ टेकडी व तेथील निसर्ग वाचवायला हवा, अशी पोस्ट माजी आमदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर केली आहे.
कुलकर्णी या वेताळ टेकडीवरील प्रस्तावित बालभारती-पौड रस्ता प्रकल्पाला विरोध करत आहेत. त्यांनी टेकडीप्रेमींच्या बाजूने किल्ला लढवत आहेत. त्यासाठी नुकतेच त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी पुढाकार घेऊन बैठक बोलावली होती. त्यामध्ये टेकडीप्रेमींनी त्यांचे मुद्दे पालकमंत्र्यांसमोर मांडले.
कुलकर्णी या स्वत: टेकडीच्या शेजारी राहतात. त्यामुळे त्यांनाही टेकडीविषयी आस्था आहे. त्यांनी आपले म्हणणे सोशल मीडियावर पोस्ट करून मांडले आहे. त्या म्हणतात, खरोखर आपल्याला बालभारती ते पौड फाटा रस्त्याची गरज आहे का ? तो रस्ता वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे का ? तर त्याचे उत्तर नाही असे आहे. वाहतूक सल्लागारांनी केलेल्या सर्वेक्षणानूसार १५ टक्के वाहतूकीला फायदा होणार आहे. टेकडीवर रस्ता करताना हजारो झाडे तोडावी लागणार आहेत. तसेच दोन किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी २५० कोटींचा होणार आहे. जनतेच्या कराचा पैसा असा वाया घालवू नये. एकीकडे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी मेट्रोच्या उद्घाटनप्रसंगी सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी आवाहन केले होते. त्यामुळे हे सर्व असताना देखील रस्ता तयार करण्यासाठी घाट घातला जात आहे. आता पुण्याची सहनशक्ती संपली आहे. आता किती सहन करायचे आमच्या पुण्याने आणि पुणेकरांनी?’