लष्कर : कॅन्टोन्मेंट भागातील गृह विलगीकरणात असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात बिनधास्तपणे बाहेर फिरत असल्याने सुपर स्प्रेडर ठरत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढीस ते कारणीभूत ठरत आहेत. एप्रिल महिन्यात शनिवारपर्यंत जवळपास ८०० कोरोना चाचण्या झाल्या असून सध्या रुग्णालयातील सर्व वॉर्ड भरलेले आहेत. जवळपास ३५ ते ४० पॉझिटिव्ह रुग्ण गृह विलगीकरणात आहेत.
गृह विलगीकरणातील रुग्णांसाठी प्रशासनाची कुठल्याही प्रकारची नियमावली नसल्याने सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. लष्कर भागातील भीमपुरा, कडबा फडई, मोदिखाना, शिवाजी मार्केट परिसर, वानवडी बाजार, घोरपडी गाव येथे पॉझिटिव्ह रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याने, हॉस्पिटलच्या भीतीने, स्वइच्छेने गृह विलगीकरणाचा पर्याय स्वीकारत आहेत. परंतु यादरम्यान ते घरात न राहता सर्वत्र सर्रास मुक्तसंचार करताना दिसत आहेत. याबाबत विचारणा केल्यावर मास्क लावले आहे, सॅनिटायझर आहे, घर लहान आहे, औषधे आणायला चाललो आहे अशी उत्तरे मिळत आहेत. कॅम्प भागातील अनेक सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांनी अशा रुग्णांना मंडळाचे परिसर, मंदिरे, विहार, विरंगुळा केंद्र अशा ठिकाणी राहण्याची, बसण्याची मुभा दिली आहे. परंतु येथील नागरिक तक्रार करीत आहेत.
रुग्णाचे नातेवाईक राजू मोहिते (नाव बदलले आहे) म्हणाले की, आमचे घर लहान असल्याने आमचा रुग्ण बाहेर बसत आहे. परंतु तो कोरोनासंदर्भात सर्व खबरदारी घेत आहे. कॅन्टोन्मेंटने गेल्या वर्षीप्रमाणे कॅन्टोन्मेंटच्या शाळांमध्ये विलगीकरणाची सोय करावी.
याबाबत पटेल रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी विद्याधर गायकवाड यांना विचारले असता त्याने मॅसेजद्वारे कळवले की, ते आजारी असल्याने सुट्टीवर आहेत. आरोग्य अधीक्षक रियाज शेख यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही
नियमांकडे दुर्लक्ष
भीमपुरा येथील अक्षय गायकवाड म्हणाले की, गेल्या वर्षी गृह विलागीकरण करताना बोर्डाचे आरोग्य अधीक्षक शेख यांचे पत्रक आवश्यक होते. शेख त्या रुग्णाच्या घरी स्वतः भेट देऊन स्वछतागृह, बाथरूमची वेगळी सुविधा आहे का, याचा अहवाल मुख्य वैद्यकीय अधीक्षकांना द्यायचे आणि त्यानंतरच पटेल रुग्णालय गृह विलगीकरणाचा निर्णय घ्यायचे या प्रकारचा शासकीय नियम सध्या हॉस्पिटल प्रशासनाकडून पाळण्यात येत नाही.