पुणे : गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांनी त्यांच्या घरातील कोविड कचरा वर्गीकरण करून त्यावर एक टक्का सोडियम हायपोक्लोराईड अथवा सॅनिटायझरची फवारणी करावी. तसेच पालिकेने नेमलेल्या कचरा वेचक अथवा पालिकेच्या यंत्रणेकडे देण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
गृह विलगीकरणातील रुग्णांना घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याविषयी संबंधित क्षेत्रीय कार्यालय स्तरावरून माहिती उपलब्ध करून घेता येणार आहे. कोरोना प्रसार आटोक्यात आणण्यासाठी पालिकेमार्फत सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर्स व विलगीकरण कक्ष उभारले आहेत. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व जागेच्या उपलब्धतेनुसार काही बाधित रुग्णांना घरी विलगीकरणात राहण्याची मुभा दिलेली आहे. बाधित रुग्ण असलेले कोविड केअर सेंटर्स, विलगीकरण कक्ष, प्रतीक्षेतील तसेच संशयित रुग्ण ठेवले आहेत, अशा सर्व केंद्रांमधील सर्व प्रकारचा जैव वैद्यकीय कचरा हा पिवळ्या रंगाच्या पिशव्यांमध्ये जमा करून पास्को एन्व्हायर्नमेंटल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे दिला जात आहे. पालिकेचा या कंपनीसोबत करार झालेला असून हा कचरा इनसिनीरेटरमध्ये जाळला जातो.
रुग्णांचा सर्वसाधारण घनकचरा (जेवणाच्या प्लेट्स, पाण्याचे ग्लास, बॉटल्स) हा कचरा ओला व सुका वर्गीकरण करून, १ टक्का सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करून हाताळला जातो.