आंबेठाण : अभ्यासातून सुटका करून घेण्यासाठी अनेक वेळा विद्यार्थी विविध कारणे सांगतात. त्यावर नामी शक्कल लढवित पिंपरी खुर्द शाळेतील मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचा घरचा अभ्यास पालकांच्या मोबाईलवर मेसेजद्वारे पाठविण्याची व्यवस्था केल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासातून पळवाट काढणे अवघड जाणार आहे.अभ्यास करायला लागू नये, म्हणून अनेक वेळा विद्यार्थी अभ्यास लक्षात राहिला नाही, रात्री लाईट नव्हती, वही घरी विसरली, अभ्यास सांगितला नाही अशी अनेक कारणे सांगून विद्यार्थी अभ्यासातून सुटका करून घ्यायचे. परंतु येथील शाळेचे मुख्याध्यापक मनोहर मोहरे यांनी यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांना घरचा अभ्यास पालकांच्या मोबाईलवर मेसेजद्वारे दिला जाणार असल्याचे मुख्याध्यापक मनोहर मोहरे यांनी नुकत्याच झालेल्या पालक सभेत जाहीर केले.विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी व प्रगतीबाबत चर्चा व्हावी, म्हणून पालकांची सहविचार सभा जिल्हा परिषदेच्या पिंपरी खुर्द येथील प्राथमिक शाळेत आयोजित केली होती. पहिलीच्या सहा विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देण्यात आला. जूनमधे पहिलीच्या वर्गात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना आतापासूनच शाळेविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांच्या मनातील भीती नाहीशी व्हावी आणि शाळेची पूर्वतयारी घडावी, या उद्देशाने या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. उद्योजक तानाजी काळे, अध्यक्षा सीमा नवनाथ काळे, रोहिदास काळे यांच्या हस्ते गुलाबपुष्प व खाऊ देऊन या मुलांचे स्वागत केले. लवकर प्रवेश मिळाल्याने या मुलांचा शिक्षणाचा अधिक सराव होणार असल्याने भक्कम पायाभरणी होईल, असे मत दत्तात्रय काळे या पालकाने व्यक्त केले. दरम्यान इंग्रजी माध्यमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा प्रवेश या शाळेत निश्चित करून पालकांनी इंग्रजी माध्यमाबाबत घेतलेला निर्णय रद्द केला व मुलांना दररोज शाळेत पाठविण्याचे आश्वासन दिले. तसेच या सर्व विद्यार्थ्यांना सुट्टीच्या दिवशी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतही मेसेजद्वारे घरचा अभ्यास मिळणार आहे. पालक सभेनिमित्त पालकांचे आभार शिक्षिका तृप्ती क्षीरसागर यांनी मानले.(वार्ताहर)
मोबाईलद्वारे मिळणार घरचा अभ्यास
By admin | Published: March 25, 2017 3:34 AM