लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोणताही सण, जातीय तणाव असो पोलिसांबरोबर खांद्याला खांदा लावून बंदोबस्तासाठी होमगार्ड येत असतात. पण, नागरी संरक्षणात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या घटकाकडे कायमच दुर्लक्ष करण्यात आले आहे. आताही कोरोना संसर्गात ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या होमगार्डंना ड्यूटीवर बोलविण्यात येऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे एका बाजूला होमगार्डकडे पोलिसांकडून मागणी आहे. परंतु गरज आहे, त्यांना ड्यूटी लावता येत नाही. दुसऱ्या बाजूला दुसरी नोकरी असल्याने कोरोनाच्या भतीमुळे लोक ड्यूटीला येत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
अनेक जण नोकरीच्या शोधात असतात. तर काही पोलीस होण्याचे स्वप्न पाहात असतात. ते शक्य न झाल्याने पर्याय म्हणून अनेक जण होमगार्ड म्हणून काम करत असतात. रस्त्यावर त्यांना लोक पोलिसांप्रमाणेच मान देतात. शासनस्तरावर मात्र या दलाकडे कायमच दुर्लक्ष केले गेले आहे. कोरोनाच्या या काळात बंदोबस्तासाठी होमगार्डला मुंबईसह पुणे व अन्य शहरातून मोठी मागणी आहे. मात्र, त्यांना कधीही वेळेवर मानधन दिले जात नाही. गणपतीत केलेल्या बंदोबस्ताचे मानधन पुढच्या वर्षी मे महिन्यात मिळते. त्यामुळे यावर अवलंबून राहणाऱ्यांचे खूप हाल होत आहेत.
पुणे शहरात नोंदणीकृत होमगार्ड - ६७५
महिला होमगार्ड - ९०
सध्या सेवेत असलेले - ५५०
५० पेक्षा अधिक वय असलेले - १२५
लसीकरणाकडे दुर्लक्ष
होमगार्ड यांना फ्रंडलाईन वर्कर म्हणून मान्यता आहे. मात्र, त्यांच्या डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, पोलीस यांच्याप्रमाणे होमगार्डसाठी लसीकरणासाठी कोणताही नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात आला नाही. ज्या पोलीस ठाण्यात त्यांना ड्यूटी दिली असेल, त्या ठिकाणच्या अधिकाऱ्याचे पत्र घेऊन स्वत:च पोलिसांसाठी असलेल्या लसीकरण केंद्रांवर जाऊन लसी घ्यावी लागत आहे. ज्यांना ड्यूटी नाही अशा अनेकांचे लसीकरण अद्याप झालेले नाही.
होमगार्डपैकी साधारण ४४५ जणांनी पहिला डोस घेतला असून जवळपास १०० जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
जगायचे कसे?
नोकरी नसल्याने मी होमगार्डच्या ड्यूटीवर अवलंबून होतो. मानधन उशिरा मिळत असले तरी ते मिळते. हे महत्त्वाचे होते. पण आता ५० वर्षांच्या पुढे वय झाल्याने ड्यूटी दिली जात नाही. बाहेर लॉकडाऊन असल्याने कोठेही काम मिळत नाही. त्यामुळे आमचे जगणेच मुश्कील झाले आहे. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने या आदेशावर पुन्हा विचार केला जाणार असल्याचे अधिकारी सांगतात. पण अजून निर्णय न झाल्याने बेरोजगारी कायम आहे.
ज्येष्ठ होमगार्ड कर्मचारी
...
गणवेशाचे आकर्षण असल्याने मी सरकारी नोकरी असतानाही होमगार्डची ड्यूटी करतो़ मी नेहमी आमच्या लोकांना सांगतो की, केवळ या ड्यूटीवर अवलंबून राहू नका. वेळेवर मानधन नाही. शिवाय कोरोनामुळे दुसरी नोकरी असलेले होमगार्ड ड्यूटीसाठी येत नाही. त्यामुळे लोक मिळत नसल्याने अधिकारी नोटिसा पाठवत आहेत. पण, तुटपुंजे मानधन तेही सहा- आठ महिन्याने मिळत असल्याने सध्या होमगार्ड ड्यूटीला जात नाही.
होमगार्ड कर्मचारी
....
दुसरा पर्यायच नसल्याने सध्या होमगार्डची ड्यूटी करत आहे. मानधन वेळेवर मिळत नसल्याने घरखर्च चालविण्यामध्येही खूप अडचणी येतात. शिवाय वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ड्यूटी लावली जाते. गेले दोन महिने बस बंद असल्याने तेथेपर्यंत जाण्यासाठी दुचाकी वापरावी लागते. तिचा पेट्रोल खर्चापासून सर्व बाबींचा खर्च अंगावर पडतो. इतरांना ज्याप्रमाणे पहिल्या तारखेला पगार दिला जातो, किमान पुढच्या महिन्यात तरी आम्हाला मानधन मिळावे, हीच अपेक्षा आहे.
त्रस्त होमगार्ड कर्मचारी