पुणे : सरबत आवडत नाही अशी व्यक्ती सापडणार नाही. पण साठवलेली सरबते पिण्यापेक्षा ताजे आणि काहीतरी वेगळे सरबत पिण्याचा आनंद काही औरच आहे. जिभेला आणि शरीराला थंडावा देणाऱ्या घरगुती सरबतांच्या या खास पाककृती.
पुदिना सरबत :
पुदिन्याची पाने मिक्सरला लावून त्यात साखर, मीठ घालून फिरवा. थंड पाण्यात हे पुदिन्याचे मिश्रण एकत्र करून गाळून घ्या. गरज वाटल्यास बर्फ घालून सर्व्ह करा पुदिना सरबत. हे सरबत फक्त चवीला नाही गुणानेदेखील थंड आहे. यामुळे शरीराची आग होणे तत्काळ थांबते.
गुलकंद सरबत :
मिक्सरमध्ये पुदिन्याची चार पाच पानं, जिरे, लिंबाचा रस, मीठ, साखर फिरवून घ्या. हे मिश्रण थंड पाण्यात टाकून गाळून घ्या. सर्व करताना त्यात तीन ते चार चमचे गुलकंद टाका. बर्फ घालून सर्व्ह करा. गुलकंद असल्यामुळे साखर कमी घालावी.
काकडी सरबत :
काकडीचे तुकडे करून ती मिक्सरवर जिरे आणि किंचित काळे घालून फिरवावी. त्यात थंड पाणी घालून सरबत सर्व्ह करावे. हे सरबत साखर घालूनही करता येते. मात्र बिनसाखरेचे अधिक चांगले लागत असल्याने डायबेटीस रुग्णांनाही घेण्यास हरकत नाही.
टोमॅटो सरबत :
लालजर्द टोमॅटो मिक्सरमध्ये फिरवताना त्यात साखर, काळे मीठ आणि मिरपूड टाकून आंबटगोड चवीचे टोमॅटो सरबत बनवता येते. हे मिश्रण गाळून झाले की त्यात थंड पाणी टाकून जरा दाटसर प्रमाणात टोमॅटो सरबत सर्व्ह करावे.