पुणे : ॲलोपॅथी-होमिओपॅथी हा वाद आणि मतमतांतरे हा जुना विषय आहे; पण होमिओपॅथीने अनेक चमत्कार घडविल्याचे पहिले आहे. ही पॅथी अनेक आजारांवर गुणकारी आहे. ॲलोपॅथीमध्ये अनेकदा औषधींचे विपरीत परिणाम होतात. होमिओपॅथी त्याला अपवाद आहे. कोणत्याही ऑपरेशन किंवा इंजेक्शनशिवाय केवळ पांढऱ्या गोळ्या प्रभावी ठरतात. त्यामुळे होमिओपॅथीला सर्वमान्यता मिळण्याची आवश्यकता आहे’, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी केले.
मिशन होमिओपॅथी व आदित्य होमिओपॅथिक हॉस्पिटल अँड हिलिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. अमरसिंह निकम लिखित ‘अ होमिओपॅथस् गाइड टू कोविड-१९’ या पुस्तकाचे प्रकाशन व ‘होमिओपॅथिक कोविड हीरो’ सन्मान सोहळ्यात निकम बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रसाद लाड, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह प्रवीण दबडगाव, होमिओपॅथीतज्ज्ञ डॉ. अमरसिंह निकम, डॉ. जसवंत पाटील, अजय कौल, ॲड. आसावरी जगदाळे, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे सदस्य डॉ. बाळकृष्ण गायकवाड उपस्थित होते.
डॉ. अमरसिंह निकम म्हणाले, ‘कोविडसारखे विषाणू येतील आणि जातीलही; पण होमिओपॅथी आयुष्यभर तुमच्यासोबत राहील. शहरी, ग्रामीण भागात सर्वसामान्यांना परवडेल, अशा स्वरूपाची ही उपचारपद्धती आहे. कोविड काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही होमिओपॅथी औषधींबाबत सकारात्मकता दाखविली.’ डॉ. नीलेश जंगले व आशिष चौबे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुचित्रा निकम यांनी आभार मानले.
--------------------
राजकारण्यांना होमिओपॅथीच्या गोळ्या द्याव्यात
होमिओपॅथी शारीरिक, मानसिक आजारांवर प्रभावी ठरते. महाराष्ट्राच्या राजकारण, तसेच सध्याची राजकीय भाषा पाहता, द्वेषाचा रोग लागल्याचे दिसते. त्यावर उपचारासाठी होमिओपॅथीने पुढाकार घ्यायला हरकत नाही. होमिओपॅथी तज्ज्ञांनी अशा परिणामकारक गोळ्या राजकारण्यांसाठीही तयार कराव्यात, जेणेकरून त्यांच्या तोंडून शिवराळ भाषा येणार नाही आणि श्रोत्यांना ऐकायला आनंद वाटेल, अशी मिश्कील टिपणी त्यांनी केली.