पुणे: एकत्रित शिवसेनेत पद हवे असेल तर मर्सिडिज द्यावी लागायची असे जाहीर वक्तव्य थेट साहित्य संमेलनात व तेही दिल्लीमध्ये करणाऱ्या विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात शिवसैनिकांचा (उद्धव ठाकरे) रोष अजूनही सुरूच आहे. पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी त्यांच्यात इमानदारीच नसल्याची टीका केली. त्यांच्याविरोधात अब्रूनुकसनीचा दावा दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर महापालिकेचे माजी गटनेते अशोर हरणावळ यांनी, यापुढे काही बोलाल तर तुमची कुंडलीच पुराव्यासह जाहीर करू, असा इशारा दिला आहे.
अंधारे म्हणाल्या, कोणत्याच पक्षात त्या कधी टिकल्या नाहीत. भारिप बहुजन महासंघात ॲड. प्रकाश आंबेडकरांना फसवले, मग शरद पवार यांच्याबाबतीतही तेच केले. शिवसेनेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना बरेच काही दिले. इमानदारी त्यांच्या शब्दकोशात नाही. ज्या पक्षाने त्यांना नाव दिले, प्रतिष्ठा दिली, पदे दिली, त्याच पक्षावर दुगाण्या झाडताना त्यांनी विचार करायला हवा. इतकी पदे घेतली तर तेवढ्या मर्सिडीज त्यांनी दिल्या. इतकी गडगंज संपत्ती आणली कुठून, हेही त्यांनी सांगावे.
अंधारे यांनी सांगितले की, डॉ. गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांचेही नाव घेतले. त्यांच्याकडे कलेक्शनचे काम होते, असे त्या म्हणाल्या. मग आता शिंदे यांनी ते कलेक्शन करत होते का? हे सांगावे. ती जबाबदारी त्यांच्यावर आहे. खासदार संजय राऊत यांनी डॉ. गोऱ्हे यांच्याबाबत असभ्य शब्द वापरले या टीकेचाही समाचार अंधारे यांनी घेतला. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत यापेक्षाही जास्त वाईट शब्द गोपीचंद पडळकर यांनी वापरले. त्यावेळी भाजपचे लोक फिदीफिदी हसत होते, त्याचे काय करायचे ते आधी सांगा. डॉ. गोऱ्हे शिवसेनेचे देणे लागतात. यापुढे बोलताना त्यांनी आपल्या वयाचा, पदाचा आब राखावा. त्यांनी सपशेल माफी मागितली तरीही त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणारच, असा इशाराही अंधारे यांनी दिला आहे.