- सलिम शेख
शिवणे (पुणे) :पुणे स्टेशन येथून घरी जाण्यासाठी रिक्षामध्ये बसलेल्या प्रीतेश रांका यांचा जवळपास एक लाख किमतीचा लॅपटॉप गडबडीमध्ये रिक्षात विसरला होता. परंतु, रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे त्यांना तो परत मिळाला.
रिक्षा चालक मोबिन आयुब पटेल यांच्या रिक्षात प्रवास करीत असताना प्रवासी प्रीतेश रांका यांचा लॅपटॉप विसरल्याचे जेव्हा रिक्षा चालकाच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे पुणे अध्यक्ष शफिक पटेल यांना सांगितले. त्यांनी समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांच्याबरोबर संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. नंतर प्रीतेश रांका या प्रवाशाला तेथे बोलावून त्याचा लॅपटॉप प्रामाणिकपणे परत दिला.
रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे व गुन्हे पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांनी रिक्षा चालकाचे अभिनंदन केले.यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे पुणे शहर अध्यक्ष शफिक पटेल तसेच उपाध्यक्ष अरशद अन्सारी, मुराद काजी उपस्थित होते.