लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केवळ ९ वी पास असलेला पण सोशल मीडियाचा वापर करण्यात पटाईत. पतीच खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात गेलेला तर पतीचा मित्रही गुन्हेगार, अशा या गुन्हेगार मित्राच्या मदतीने हनीट्रॅपचा सापळा लावून आजवर अनेकांना लुबाडले. न्यू पनवेलच्या एका व्यावसायिकाने मात्र पोलिसांकडे जाण्याचे धाडस केले अन् कोंढवा पोलिसांनी या तरुणीसह ६ जणांना ७२ तासांच्या आत अटक केली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कोंढवा तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे व त्यांच्या पथकाचे कौतुक केले आहे.
रवींद्र भगवान बदर (वय २६, रा. इंदापूर), सचिन वासुदेव भातुलकर (रा. येवलेवाडी), आण्णा राजेंद्र साळुंके (वय ४०, रा. गोकुळनगर कोंढवा), अमोल साहेबराव ढवळे (वय ३२, रा. बाणेर, मूळ सोलापूर माढा), मंथन शिवाजी पवार (वय २४, रा. इंदापूर) आणि १९ वर्षांची तरुणी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
या टोळीतील १९ वर्षांच्या तरुणीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पनवेलच्या व्यावसायिकासोबत ओळख निर्माण केली. त्यातूनच मैत्री करत त्यांना तरुणीने जाळ्यात खेचले. तिने व्यावसायिकाला भेटण्यासाठी कोंढव्यातील येवलेवाडी येथे बोलावून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. या तरुणीच्या साथीदारांनी व्यावसायिकाकडे ५० लाखांच्या खंडणीची मागणी केली. या वेळी व्यावसायिकाच्या खिशातील ५० हजारांची रोकड व त्यांच्याजवळील एटीएम कार्डद्वारे ३० हजार असे ७० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. पाच लाख रुपये देण्याचे ठरल्यानंतर आरोपी व्यावसायिकाला सतत फोन करत होते. शेवटी त्यांनी कोंढवा पोलिसात धाव घेत फिर्याद दाखल केली होती.
तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलीस अंमलदार गणेश चिंचकर यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपींना बोपदेव घाट गारवा हॉटेल येथून अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. अटक टोळीतील रविंद्र बदर हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. तरुणीच्या पतीसोबत त्याची मैत्री होती. त्यातूनच त्याने संबंधित तरुणी व तिच्या भावाला एकत्र करून येवलेवाडी परिसरात एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. तेथून तो ही हनीट्रॅप टोळी चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोंढवा तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, हवालदार योगेश कुंभार, गणेश चिंचकर, महेश राठोड, अभिजित रत्नपारखी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली.