वेल्हे : हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांवर हल्ला चढविला. मधमाशांनी चावे घेतल्याने ४ जण गंभीर जखमी झाले. हे सर्व पर्यटक मुंबईतील आहेत.स्थानिक शेतकऱ्यांनी किल्ल्यावर धाव घेतली. जखमींना झोळीतून पायथ्याशी असलेल्या गुंजवणे गावात आणून पुढील उपचारासाठी करंजावणे प्राथमिक अरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी नांदेडकर जखमींवर उपचार करत आहेत.मुंबई येथील ‘नेचर लव्हर्स’ नावाच्या संस्थेमार्फत दरवर्षी २३ ते २६ डिसेंबर या कालावधीत राजगड किल्ल्यावर मोठा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी ही उत्साहात कार्यक्रम साजरा होत आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी संस्थेचे कार्यकर्ते राजगडाला प्रदक्षिणा घालण्याचा कार्यक्रम चालू असताना ७ नंबरच्या गटामधील स्वप्निल मोहन जाधव, (वय २८) शंकर मारुती शेलार (वय २७), पुरुषोत्तम लक्ष्मण कडलसकर (वय ५८, सर्व रा. मुंबई) यांच्यावर गडाच्या पश्चिमेकडील बाजूने प्रदक्षिणा घालताना मधमाशांनी हल्ला चढविला. मधमाशांनी चावा घेतल्याने तिघेही गंभीर जखमी झाले. तसेच विनायक पटवर्धन (वय ४५) हे इसम मधमाशांच्या हल्ल्याला घाबरुन गडाच्या कपारीतून धावत सुटले. कपारीतून ते घसरुन पडल्यामुळे जखमी झाले.
स्थानिक शेतकरी धावले मदतीलापर्यटकांचा आरडाओरडा ऐकून स्थानिक शेतकरी संतोष ढेबे, तानाजी हारपुडे, संजय रसाळ, अंकुश पडवळ, अंकुश भिलारे, विलास लिम्हण, हनुमंत दरडिगे, प्रकाश ढेबे, सुभाष शिळीमकर यांनी जखमींकडे धाव घेतली. जखमी पर्यटकांना झोळीत घालून गडाच्या पायथ्याशी आणले व वाहनातून करंजावणे अरोग्य केंद्रात पाठविले.राजगड हा किल्ला अतिदुर्गम असून किल्ल्याची व्याप्ती प्रचंड आहे. या ठिकाणी अनेक ठिकाणी धोकादायक ठिकाणे असून गडावर जाणारी पाऊलवाट अरुंद आहे. याठिकाणी येणारे पर्यटक शिस्तीचे पालन करत नाहीत आणि स्थानिक नागरिकांच्या सूचनांना न जुमानता दुर्लक्ष करत असल्याने वारंवार दुर्घटना घडत आहेत. वनविभागाकडे नावनोंदणी करणे बंधनकारक असतानाही पर्यटक नाव न नोंदवता गडावर जातात. यामुळे गडावर कोण गेले आहे आणि काय चाचले आहे याची नोंद राहत नाही. दुर्घटना घडल्यावर ऐनवेळी स्थानिकांची मात्र धावपळ होते.