बडतर्फ पोलीस, दोन महिलांसह चौघांना अटक
बारामती : महिलादिनी शहर पोलीस ठाण्याचा ‘चार्ज’ मिळालेल्या महिला पोलीस अधिका-यांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. ‘हनीट्रॅप’चा सापळा लावून लाखोंची खंडणी मागणारी टोळी या महिला पोलीस अधिका-याने गजाआड करत ‘वूमन पॉवर’ अधोरेखित केली.
पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी याबाबत अधिक माहिती दिली. त्यानुसार बारामती शहरातील अशोकनगर भागात राहणा-या ४५ वर्षीय व्यापा-याने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार राकेश रमेश निंबोरे (वय २४, रा. साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा), स्मिता दिलीप गायकवाड (वय २३, रा. फलटण, जि. सातारा), आशिष अशोक पवार (वय २७, रा. भुइंज, ता. वाई, जि. सातारा), सुहासिनी अशोक अहिवळे (वय २६, रा. मंगळवार पेठ, फलटण, जि. सातारा) या चौघांना अटक केली आहे.
आरोपी स्मिता हिने मोबाइल फोनवरून फिर्यादीबरोबर ओळख निर्माण केली. तसेच २७ फेब्रुवारी रोजी फिर्यादीला फलटण येथे बोलावून घेतले. तिच्या फ्लॅटवर तिची अनोळखी मैत्रीण आणि आशिष पवार, राकेश निंबोरे (गुरू काकडे) यांनी फिर्यादीला महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवली. तसेच १० लाख रुपये खंडणीची मागणी केली. त्यानंतर फिर्यादीने गरीब असल्याचे सांगितल्यावर पाच लाखांवर तडजोड करण्यात आली. त्यात १ लाख रुपये घेऊन आणखी ४ लाख रुपये बारामतीत घेण्यास येत असल्याचे आरोपींनी त्यास सांगितले. त्यावर घाबरलेल्या फिर्यादीने शहर पोलीस ठाणे गाठले. त्या दिवशी महिला दिन होता, या दिवशी महिला पोलीस अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे यांच्यासह महिला पोलीसांना ठाण्याचा ‘चार्ज’ होता. त्याच दिवशी फिर्यादीने केलेल्या तक्रारीची दखल घेत शेंडगे यांनी पोलीस पथक तयार केले. या पथकाने सापळा रचत बारामती बसस्थानकात आरोपी निंबोरे यास सिनेस्टाइलने पाठलाग करीत पकडले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत इतर आरोपींची नावे निष्पन्न झाली. त्यानंतर इतर आरोपींना अटक करण्यात आली. याचवेळी इतर तीन आरोपी फिर्यादीच्या घरी गेल्याचे फिर्यादीला समजले. पोलिसांना ही माहिती मिळाल्यावर त्या तिघांना अशोकनगर भागातून अटक केली आहे. यावेळी आरोपी निंबोरे याच्याकडून २० हजार रुपये खंडणी, कारसह ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी पवार हा बडतर्फ पोलीस आहे. तो कुरार (बृहन्मुंबई) येथील पोलीस ठाण्यात होता. तर निंबोरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर लोणंद, फलटण पोलीस ठाण्यात एकूण ११ गुन्हे दाखल आहेत.
—————————————————————
अनोळखी व्यक्तीकडून ‘हाय’
आरोपी स्मिता गायकवाड तिच्या मोबाइलवरून ‘हाय’चा संदेश पाठवून ओळख वाढवत असे. तसेच फोटो पाठवून, व्हिडीओ कॉल करून गोड बोलून गप्पा मारत असे. त्यानंतर संबंधित व्यक्तीबरोबर ओळख वाढवून खंडणी मागण्याचे प्रकार घडत असत. आज हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी बारामतीकरांना असा अनुभव आला असेल तर न घाबरता संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच अशा प्रकारांपासून सावधान राहण्याची सूचना केली आहे.
हनीट्रॅप लावणा-या आरोपींसह बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक आश्वीनी शेंडगे आणि अन्य.